मुंबई (वृत्तसंस्था) अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरला गुरुवारी समन्स बजावले. २०१९ मध्ये करण जोहर यांच्या घरी झालेल्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओबाबत शुक्रवारपर्यंत माहिती देण्याचे नोटिसीत सांगितले आहे.
करण जोहर यांना स्वत: उपस्थित राहण्याची गरज नसून ते त्यांचा प्रतिनिधी पाठवू शकतात, असे एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. २८ जुलै २०१९ रोजी त्यांच्या घरी झालेल्या पार्टीचे चित्रीकरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या गॅजेट्सची माहिती देण्याचे जोहर यांना सांगण्यात आले आहे. तसेच कोण काेण या पार्टीत सहभागी झाले होतेे. एखादी निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली होती का, याचीही माहिती द्यावी लागणार आहे. बॉलीवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर करण जोहर यांच्या घरी आयोजित एका पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात मलायका अरोरा, झोया अख्तर, अर्जुन कपूर, अयान मुखर्जी, दीपिका पदुकोण, कार्तिक आर्यन यासारखे कलाकार होते. बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी करण जोहरचे नाव पहिल्यापासून चर्चेत राहिले आहे. शिरोमणी अकाली दलाचे नेते मनजिंदरसिंग सिरसा यांनी करण जोहरच्या पार्टीची व्हिडीओ क्लिप जारी करून चौकशीची मागणी केली होती. मात्र करण जोहर ने सर्व आरोप फेटाळले होते. तसेच अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता.