जळगाव (प्रतिनिधी) विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक नुकतेच पारित करण्यात आले. या कायद्याला भाजपाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या घरासमोर भाजपा युवा मोर्चाच्यावतीने निषेधार्थ रांगोळी काढून निषेध व्यक्त करण्यात आला.
विधी मंडळात महाविकास आघाडीच्या सरकारने विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकाला राज्यात भाजपाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याचा निषेध म्हणून भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी १७ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या घरासमोर गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करत घरासमोर काळी रांगोळीने रांगोळी काढून अनोखे आंदोन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, प्रदेश सचिव भैरवी वाघ-पलांडे, भाऊसाहेब पाटील, सचिन पवार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पालकमंत्री यांच्या संपर्क कार्यालयासमोर विद्यापीठ कायद्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यात शिवसेना-भाजपा वाद पेटला आहे. यापुर्वी देखील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर वक्तव्य करणाऱ्या नारायण राणेचा निषेध व्यक्त करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजपा कार्यालयात कोंबड्या फेकल्याचा प्रकार घडला होता. याबाबत भाजपाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. त्याप्रमाणे आता विद्यापीठ कायद्याचा मुद्दा उचलून धरत जिल्ह्यात पुन्हा शिवसेना आणि भाजपा वाद पेटण्याची शक्यता दिसून येत आहे