अमळनेर (प्रतिनिधी) एखाद्या गावाचा इतिहास त्या गावाच्या स्मृतिपटलाच्या गाभ्यात दडलेला असतो. तो गावातील खाणाखुणांमधून डोकावत राहतो. त्याचे संदर्भ हरवतात, त्याची भाषाही गहाळ होते. अन् स्मृतिपटलावर फक्त राहतात ती तोडकीमोडकी चित्रे. या चित्रांचा क्रम लावत एखाद्या गावाचा इतिहास आपले अस्तित्व अन् वैभवाच्या खुणा दाखवित राहतो. अशीच काहीशी आहे अमळनेर तालुक्याला पहिला आमदार देणार्या, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शेतकी विद्यालयाच्या रूपाने अमळनेरसह इतर तालुक्यातील ग्रामीणांसाठी शिक्षणांची कवाडे उघडणार्या आणि आमदारांचे गाव म्हणून परिचित असलेल्या अमळगावची. मात्र, गेल्या 35 वर्षांपासून स्थानिक राजकारण्यांनी स्वाहाकार करत गावाचे नाव मोठे लक्षण खोटे ठरवत माती केली आहे.
दिशाहीन झालेल्या अमळगावला योग्य दिशा देण्यासाठी खाकी वर्दीतील एक दर्दी युवा नवतरूणांमध्ये ‘उमेद’ जागवत पुढे सरसावला आहे. ज्याला कोणताही राजकीय वारसा नाही, ज्याला वतनदारी नाही आणि घराणेशाहीचाही तो वारस नाही. त्याने पाचवीला पुजलेले अठराविश्व दारिद्रय, गावकुसाबाहेरील असह्य, नरकयातनेतील जीणे जगत स्वतःच्या बुद्धीमत्तेच्या बळावर पोलीस दलात उपनिरीक्षक पद गाठले आहे. आपण आता कुठे आहोत याचे भान व आपण कुठून आलो आहोत याची जाणीव ठेवत संबंध गावाशी केवळ आपुलकीच्या भावनेतून तो नाड जोडून आहे. गावातील तरूणांचा स्पर्धा परीक्षकडे कल असला पाहिजे म्हणून त्याने समविचारी मित्रांसोबत उमेद फाउंडेशनच्या माध्यमातून जाणीवपूर्वक प्रयत्न चालवले आहेत. वेळप्रसंगी अडलेल्या नडलेल्यांसाठी तो पदरमोड करतो. तो ऐवढ्यावरच थांबलेला नसून आपल्या गावची दशा बदलली पाहिजे, गावाला योग्य दिशादर्शक मिळाले पाहिजेत यासाठी जाणीव जागृती करत आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षकपदी कार्यरत सुरेश भीमराव पांचाळ यांना चौखुर विषयांचे वाचन आणि लिखाणाचा मोठा व्यासंग आहे. पोलीस दलात ईमाने-ईतबारे कर्तव्य बजावत असताना प्रचंड व्यस्ततेतही ते वेळ काढून वाचन व स्वतःचे लिखाण करत असतात. सुमारे 300 पेक्षा अधिक विविध विषयांवर त्यांनी कविता रचल्या आहेत. त्यांचे स्वरचित “खावाव नै, खाऊ देवाव नै…खाणाराले जीरू देवाव नै…लाई दिसुत जीवले घोरं, तुमना लाई दिसूत जीवले घोर, आमु नवी पिढीना तरुण पोरं” हे अहिराणी बोलीभाषेतील गाणे नुकतेच यु-ट्यूबवर रिलीज झाले आहे. त्यानंतर लगेचच हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून नेटीझन्सचा(नेटकरी) उदंड प्रतिसाद लाभत आहे.
या गाण्यातून त्यांनी आपल्या गावाची जी दुर्दशा झाली आहे ती दूर सारली जाऊन योग्य दिशा देण्यासाठी तरूण पीढीसह ग्रामस्थांना आर्जव केली आहे. भुरट्या, चोरट्या पुढार्यांच्या डोळ्यात त्यांनी झणझणीत अंजन घातले आहे. योजना हडप करणार्यांना, प्रत्येक कामात मलिदा खाणार्यांना, ग्रामपंचायतीतून आपली घरे भरणार्या परंपरागतांना, ग्रामपंचायतीला आपल्या कमाईचे व घर चालविण्याचे साधन मानणार्यांना, गावाला ओंगाळवाणे स्वरूप आणणार्यांना, गावगाड्याला अस्वच्छतेमुळे रोगराईच्या विळख्यात अडकविणार्यांना धडा शिकविल्याशिवाय आणि निवडणुकांमध्ये घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहू नका, असे स्फुरण त्यांनी चेतविले आहे. यासाठी त्यांनी अमळगाव हे गाव डोळ्यासमोर ठेवले असले तरी अमळगावसारखीच किंबहुना त्याहुनही विदारक अवस्था अनेक गावांची आहे. त्यामुळे त्यांचे गाणे लोकप्रिय झाले आहे.