नांदेड (वृत्तसंस्था) चोरीच्या गुन्ह्यामध्ये ब समरी अहवाल पाठविण्यासाठी ३० हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई २४ जून रोजी करण्यात आली. सूर्यकांत मारोती कांबळे असे अटक करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
तक्रारदाराच्या पोकलेनच्या केबिनमधून एक लाख ६ हजार ७०० रूपये चोरीला गेले होते. त्याबाबत मनाला पोलिस ठाण्यात १८ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक कांबळे हे करत होते. नमूद गुन्ह्यातील चोरी गेलेले एक लाख हजार ७०० रूपये हे चार दिवसानंतर पोकलेनच्या केबिनमध्येच मिळून आले होते. त्यामुळे तक्रारदारांनी पीएसआय कांबळे यांना सांगितले असता त्यांनी ‘आमचे काय असे म्हणून एक लाखाची मागणी केली.
पैसे दिल्यास या गुन्ह्यात ‘ब’ वर्गात अखेर अहवाल पाठवतो. पैसे नाही दिले तर तुम्हालाच आरोपी करतो असे म्हणून लाचेची मागणी केली. तक्रारदाराने या प्रकरणात तक्रार दिली. कांबळे यांनी शासकीय पंचासमक्ष ५० हजार रूपये मागितले, तडजोडीअंती ३० हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. कांबळे यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध भाग्यनगर पोलिस सात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.