जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील जांभूळ येथील ४५ वर्षीय कैलास विठोबा वडाळे १४ मे पासून बेपत्ता झाले होते. या प्रकरणात एलसीबीने रमेश संपत मोरे याला अटक केली होती. त्याने खून केल्याचेही कबूल केले. मात्र, मृतदेहाची विल्हेवाट नेमकी कुठं लावली याबाबत तो दृश्यम सिनेमाप्रमाणे पोलिसांची दिशाभूल करतोय. अगदी मोरेच्या सांगण्यावरून सुमारे ८ तासांच्या प्रयत्नानंतर एका विहिरीतून गोणपाटातील मृतदेह बाहेर काढला. परंतू तो मृतदेह एका श्वान सदृश्य प्राण्याचा निघाला. असचं काहीसं दृश्यम सिनेमाच्या पहिल्या भागातही घडलं होते. त्यामुळे पोलिस ही चक्रावले असून कैलास वडाळे यांची मर्डर मिस्ट्री दृश्यम सिनेमाप्रमाणे गोल-गोल फिरतेय का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेमकं काय घडलं !
जामनेर तालुक्यातील जांभूळ येथील रहिवासी कैलास विठोबा वडाळे १३ मे रोजी दुपारी ३ वाजेपासून बेपत्ता झाले होते. परिवारातील लोकांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता. त्यामुळे मुलगा अविनाशने १४ मे रोजी पहूर पोलीस स्टेशनमध्ये वडील कैलास वडाळे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पहूर पोलिसांनी सर्वत्र शोध घेतला परंतू त्यांचा कुठंही शोध लागला नाही. एक-एक करीत महिना उलटून गेला. पण कुठलीच माहिती हाती लगत नव्हती. शेवटी कैलास वडाळे यांच्या कुटुंबियांनी काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची भेट घेतली आणि सर्व हकीगत सांगितली. पोलीस अधीक्षकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत याबाबतचा तपास स्थानिक गुन्हे शाखेला करण्याचे आदेश दिले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांनी कर्मचाऱ्यांचे पथक कामाला लावले आणि अवघ्या काही तासात वडाळे यांचा मित्र रमेश मोरे याल ताब्यात घेतले.
उसनवारीच्या पैशांवरून वाद !
संशयित मोरे याने सुरूवातीला सांगितले की, कैलासने उसनवारीने मोरे वाला पैसे दिले होते. परंतु तो पैसे परत करत नसल्यामुळे त्यांनी तगादा लावला होता. घटनेच्या दिवशी दोघांनी मद्यपान केले. यानंतर कैलास यांनी पुन्हा पैशांची विचारणा केली. याचा राग आल्यामुळे मोरेने त्यांना भीती दाखवण्यासाठी ठार मारण्याची धमकी दिली. त्यासाठी शेतातून एक कुऱ्हाड आणली. दोघांमध्ये भांडण सुरु असतानाच मोरेने कुन्हाडीने डोक्यात वार केल्याने कैलास यांचा मृत्यू झाला. घटना लपवण्यासाठी मोरेने वडाळे यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.
मोरेकडून पोलिसांची दिशाभूल !
कैलास वडाळे यांच्या कुटुंबियांनी मोरेवर संशय व्यक्त केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी त्याला ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. एवढेच नव्हे तर कैलास यांना मारण्यासाठी वापरलेली कुऱ्हाड त्यांची चप्पल रक्ताने माखलेले कपडे पोलिसांना दिले. परंतु, खुन झालेला असल्यामुळे मृतदेह पोलिसांना हवा होता. त्यासाठी शुक्रवारी रात्री पुन्हा कसून चौकशी केली. या वेळी मोरेने मृतदेह एका विहिरीत फेकल्याचे सांगितले.
तब्बल आठ तासांच्या प्रयत्नानंतर विहिरीतून गोणपाट काढले !
दुसरीकडे मयताचा मुलगा व नातेवाइक यांना शोधकार्यादरम्यान सोयगाव तालुक्यातील हिंगणे जंगलातील एका विहिरीत संशयास्पद गोणी दिसून आली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मारेकरी मोरे यानेही याच विहिरीत मृतदेह असल्याचे सांगितले. स्थानिक पोहणाऱ्यांकडून तब्बल आठ तासांच्या प्रयत्नानंतर विहिरीतून एका गोणपाटात बाहेर काढले. त्या गोणपाटमध्ये काही अवशेष मिळाले. मात्र, हे अवधेश श्वानसदृश्य एका प्राण्याचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोरे हा पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे सिद्ध झाले. मोरे असे का करतो आहे? याचे कोडे पोलीसानाही पडले आहे. पोलिस दररोज मारेकऱ्याला घेऊन जंगल व परिसर पालथे घालत आहेत. मात्र, त्याने अजूनही मृतदेह कुठे फेकला आहे याची कबुली दिलेली नाही. तो हुलकावणी देत आहे.