चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरात २०१० वर्षी सार्वजनिक आंबेडकर जयंती साजरी करत जिल्हाधिकारी यांचा जमावबंदीचा आदेश मोडला आणि उशिरापर्यंत कार्यक्रम केला म्हणून समाजातील प्रमुख नेते व भिम जयंतीचे आयोजक यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. परंतू दि २० फेब्रुवारी २०२१ रोजी या खटल्याचा निकाल लागला असून सर्व समाज बांधवांची निर्दोष मुक्तता झाली आहे. दरम्यान, या खटल्याचे कामकाज बघणाऱ्या अँड.राहुल जाधव यांचा नुकताच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सत्कार करण्यात आला.
सन २०१० मध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चाळीसगाव येथे साजरी केल्याने जिल्हाधिकारी यांचा जमावबंदीचा आदेश मोडला आणि उशिरापर्यंत कार्यक्रम केला म्हणून समाजातील प्रमुख नेते व भिम जयंतीचे आयोजक बौद्धवासी गोविंद आप्पा जाधव, धर्मभूषण बागुल, रामचंद्र जाधव, कालिदास अहिरे, गौतम जाधव, किरण जाधव आणि इतर ३ जणांवर चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्ये प्रिव्हेन्शन ऑफ वॉटर आणि एअर पोलुशन ऍक्ट १९७४ चे कलम १५(१) आणि मुंबई पोलीस अधिनियम १३७ नुसार गुन्हा रजी नं.३०१६/२०१० हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा होता. सदर गुन्ह्यात सन २०११ मध्ये आरोपपत्र दाखल झाले होते. या खटल्यात समाजाच्या वतीने सर्व नेते मंडळी यांनी तब्बल ११ वर्ष ही केस चालवून न्यायालयीन लढा दिला. दि.२० फेब्रुवारी २०२१ रोजी न्यायाधीश भागवत साहेब यांनी सदर गुन्ह्याचा निकाल जाहीर केला आणि सर्व नेते व समाजबांधवांची निर्दोष मुक्तता केली.
याकामी आरोपीतर्फे अँड.राहुल भिमराव जाधव यांनी खटल्याचे कामकाज पाहिले तसेच अंतिम युक्तिवाद केला. या न्यायालयीन लढाईत सर्व समाजातील नेत्यांना यश आल्याने सर्वांनी मिळून आज उत्कृष्ट व प्रभावीपणे बाजू मांडून खटल्यात यश संपादन केल्याने सर्व समाजाच्या वतीने अँड.राहुल बी.जाधव यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारा प्रसंगी समता सैनिक दलाचे नेते धर्मभूषण बागुल, नगरसेवक रामचंद्र जाधव, पीआरपी नेते कालिदास अहिरे, गौतम जाधव, महेश चव्हाण, किरण जाधव, नगरसेवक रोशन जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते बबलु जाधव, किरण मोरे आदी समाज बांधव उपस्थित होते. अँड.राहुल जाधव आम्हा सर्वाना आपला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार समाज बांधवांनी काढून त्यांचा सत्कार केला.