धरणगाव (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या पथकाने छापेमारी करत शहरातील दोन धान्य गोदाम नुकतेच सील केले होते. धक्कादायक म्हणजे यातील एका गोदामातून रात्रीतून मोठा प्रमाणात माल गायब झाल्याची चर्चा आहे. स्थानिक महसूल विभागाने बुधवारी पुन्हा तपासणी केली. आधीच्या पंचनाम्यानुसार मालमध्ये तफावत आढळून आल्याच्या वृत्ताला जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दुजोरा दिला आहे.
दि. ४ जानेवारी रोजी शहरातील चोपडा रोडवरील दोन गोदामावर दुपारी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या पथकाने अचानक छापा टाकला होता. गोदामावर पथक धडकल्यानंतर त्यांना परिसरात मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात धान्य आढळून आले होते. यानंतर गोडाऊनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात धान्यसाठा आढळून आला होता. पथकाने लागलीच गोदाम सील केले होते. यानंतर जिल्हाधिकारी यांच्या पथकाने चोपडारोडवरीलच दुसऱ्या गोदामावर धडक दिली होती. याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात धान्य आढळून आले होते. दोघं गोदाम सील करण्यात आले होते. यानंतर काल (बुधवार) याबाबत घटनास्थळी सुनवाई झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबत स्थानिक महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे साफ टाळले.
दरम्यान, जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी कारवाई केल्याच्या रात्रीच गोदामाच्या मागचा दरवाजा शिताफीने उघडून बहुतांश माल लंपास करण्यात आल्याची चर्चा गावात सुरु होती. याचीच माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी सील केलेल्या गोदामांची बुधवारी पुन्हा तपासणी केली. सील उघडून पंचनामा केल्याचेही कळते. त्यानुसार गोदाम सील केल्याच्या दिवशी आणि बुधवारी केलेल्या पंचनाम्यानुसार गोदामातील माल कमी आढळून आल्याचेही कळते. याबाबत पुरवठा विभाग तथा तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे साफ टाळले. या प्रकरणात आता पुढे काय होते?, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
सील केलेल्या गोदामाच्या मालात तफावत आढळून आली आहे. अहवाल माझ्याकडे आल्यानंतर नेमकी किती तफावत आहे, याबाबत सांगता येईल आणि त्यानुसारच पुढील कारवाईची दिशा ठरेल.
-अमन मित्तल (जिल्हाधिकारी, जळगाव)