धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत अमळनेर रस्त्यावर असलेल्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण संदर्भात धरणगावात गायरान बचाव मंचतर्फे ८ डिसेंबरला मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी हितासाठी निघत असलेल्या या मूकमोर्चास भारतीय जनता पार्टीने जाहीर पाठींबा दिला आहे.
धरणगावातील अमळनेर रोडवर असलेल्या शासकीय गायरान जमिनीवर अनधिकृत बांधकाम करून शासकीय गायरान जमीन बळकावण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करीत आहे. त्या ठिकाणा वरील बेकायदेशीर बांधकामा विरोधात तक्रार केली असता महाशय जिल्हाधिकारी यांनी सदरील अतिक्रमित बांधकाम काढून टाकण्याचे आदेश दिलेले असतांना देखील धरणगाव तालुक्याचे तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी आतापर्यंत केलेली नाही. सदर अतिक्रमणामुळे गुरांना चरण्यास जागा शिल्लक राहणार नाही. त्यामुळे पशुधन पालक व शेतकरी बांधावांची मोठया प्रमाणात गैरसोय होईल कारण शहरालगत एकमेव गायरान जागा आहे. म्हणून गायरान बचाव मंचच्या वतीने मुकमोर्चाचे नियोजन दि. ८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९:०० बालाजी मंदिरा पासून केलेले आहे.
शेतकरी हितासाठी निघत असलेल्या मूकमोर्चास भारतीय जनता पार्टीचा जाहीर पाठींबा देत असून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने मुकमोर्चात सहभागी होतील, असे आशयाचे पत्र आज भारतीय जनता पार्टीने गायरान बचाव मंचचे संयोजक अमोल महाजन, सहसंयोजक अँड.राहूल पारेख, शिरिषआप्पा बयस इत्यादीकडे दिले. याप्रसंगी ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, अँड.वसंतराव भोलाने, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, जुलाल महाजन, राजू महाजन, कन्हैया रायपूरकर, टोनी महाजन, अनिल महाजन, निलेश महाजन, विक्की महाजन आदी उपस्थित होते.