पुणे (वृत्तसंस्था) मेट्रो प्रकल्पासाठी (Pune Metro Project) आग्रही भूमिका मांडणारे आणि पुणे, पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार शशिकांत लिमये (वय 71) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. लिमये यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे.
लिमये यांना गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घरी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारीकरणाबाबत दोन दिवसांपूर्वी महामेट्रोने घेतलेल्या बैठकीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील डोंगराळ भागात रेल्वे मार्गांचे विस्तारीकरण कसे करता येईल, तसेच पुण्याभोवती लोहमार्गाचे विस्तारीकरण कसे असावे, याबाबतही आराखडे त्यांनी तयार केले होते.
लिमये यांचे शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, फर्ग्युसन महाविद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे झाले. त्यानंतर मुंबई आयआयटीमधून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ते भारतीय रेल्वेत दाखल झाले. रेल्वेत विविध ठिकाणी जबाबदारी पार पाडल्यानंतर विभागीय व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही ते सक्रिय होते. तीन खासगी कंपन्यांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच रेल्वे महामार्ग रेल्वे अभियांत्रिकी महाविद्यालयतही ते नियमितपणे व्याख्याते म्हणून जात. पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी २०१२ पासून ते आग्रही होते २०१४ मध्ये त्यांना महामेट्रोद्वारे मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. पुणे आणि पिंपरीतील मेट्रोचा आराखडा तयार करण्यात लिमये यांची महत्त्वाची भूमिका होती. मेट्रोबद्दलचे गैरसमज दूर करण्यात ते कायम अग्रेसर असत.