कुर्ला (वृत्तसंस्था) घरगुती भांडणातून एका पुरी भाजी विकणाऱ्याने एका सात वर्षीय मुलीवर आणि वृद्धावर उकळते तेल फेकल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत चिमुकलीसह वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी (Injured) झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील कुर्ला परिसरातील कसाई वाडीत एक पुरीभाजीचं दुकान आहे. घटनेच्या दिवशी एक वृद्ध व्यक्ती आणि सात वर्षीय मुलगी दुकानात पुरीभाजी खरेदी करण्यासाठी गेले होते. यावेळी संबंधित वृद्धाचं पुरीभाजी विक्रेत्यासोबत वाद झाला. बाचाबाची झाल्यानंतर हा वाद वाढतच गेला. यानंतर संतापलेल्या पुरीभाजी विक्रेत्यानं रागाच्या भरात सात वर्षांच्या मुलीसह ज्येष्ठावर उकळतं तेल टाकलं. या हल्ल्यात दोघंही गंभीर जखमी झाले असून त्याच्या अंगावर अनेक ठिकाणी भाजलं आहे.
या हल्ल्यात जखमी झालेल्या सात वर्षीय अल्पवयीन मुलीला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याठिकाणी तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पीडितांच्या कुटुंबीयांनी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती चुनाभट्टीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देसाई यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. पण घटनेनंतर अद्याप आरोपीला मोकाट असून पोलिसांनी त्याला अटक केली नाही.