वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) तैवान आणि चीन दरम्यान असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन नौदलाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन नौदलाची आण्विक पाणबुडीचा अपघात झाल्याचं वृत्त आहे. दक्षिण चीन समुद्रातील एका अज्ञात रहस्यमय वस्तूला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात नौदलाचे ११ सैनिक जखमी झाले आहेत.
ज्या वेळी पाणबुडीचा अपघात झाला त्यावेळी अमेरिकची पाणबुडी ही आंतरराष्ट्रीय समुद्राच्या सीमेत होती, असं अमेरिकेच्या पॅसिफिक महासागराच्या आरमारानं गुरुवारी सांगितलं.
या अपघातासंदर्भात अमेरिकन नौदलानं एक संक्षिप्त निवेदन प्रसिद्ध केलं आहे. या निवदेनात म्हटलं आहे की, युएसएस कनेक्टिकट आण्विक पाणबुडी अपघातानंतर स्थिर आहे. आण्विक संयंत्राचे कोणतंही नुकसान झालं नसल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आह. मात्र अमेरिकन नौदलानं हा अपघात नेमका कुठं झाली याबाबतची माहिती दिलेली नाही. मात्र आण्विक पाणबुडीचा अपघात दक्षिण चीन समुद्रात झाला असल्याचं वृत्त USNI न्यूजनं दिलं आहे. दक्षिण चीन समुद्रात झालेल्या या अपघातानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.