वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) राहुल गांधी यांना काहीतरी चांगले करून दाखवायचे आहे पण त्यांची गुणवत्ता आणि पॅशन अपुरी पडते, अशी टिप्पणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे.
राहुल गांधी हे कसल्या तरी अदृश्य दडपणाखाली असतात. राहुल गांधी म्हणजे असा विद्यार्थी आहेत की, ज्याला शिक्षकांसमोर चांगली कामगिरी करुन दाखवायची असते. पण कुठेतरी त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता किंवा संबंधित विषयात प्रावीण्य मिळवण्याची पॅशन कमी पडते, असे मत बराक ओबामा यांनी मांडले. A Promised Land या पुस्तकात बराक ओबामा यांनी इतर जागतिक नेत्यांविषयीही भाष्य केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची शारीरिक तंदुरुस्ती वाखाणण्याजोगी आहे, अशी मोघम टिप्पणी बराक ओबामा यांनी केली आहे. तर अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष जो बायडने हे एक सभ्य, प्रामाणिक आणि निष्ठावान व्यक्ती असल्याचे बराक ओबामा यांनी पुस्तकात म्हटले आहे. या परीक्षणात ओबामा यांच्या पुस्तकातील अनेक रंजक गोष्टींचा उल्लेख आहे. ओबामा यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात भेट घेतलेल्या जागतिक नेत्यांविषयीचे अनुभव कथन केले आहेत. यामध्ये भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा समावेश आहे. ओबामा यांनी मनमोहन सिंग यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. त्यांनी मनमोहन सिंग यांचे वर्णन ‘ निर्विकार प्रामाणिकपणा असलेली व्यक्ती’ असे केले आहे. बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल यांनी २००९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांची पत्नी गुरूशरण कौर यांची अमेरिकेत भेट घेतली होती. यावेळी ओबामा दाम्पत्याकडून मनमोहन सिंग आणि त्यांची गुरूशरण कौर यांच्यासाठी खास मेजवानीचेही आयोजन करण्यात आले होते.