मुंबई (वृत्तसंस्था) दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. दसरा मेळाव्यातील भाषणानंतर आता आम्हाला उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्टपणे दिसू लागले आहेत. यामध्ये कोणतीही शंका उरलेली नाही, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली.
“दसरा मेळाव्यानंतर आता पूर्ण आत्मविश्वासानं सांगू शकतो, आम्हाला उद्धवजींमध्ये राहुलजी एकदम स्पष्टपणे दिसतात. यात कोणतीही शंका नाही,” असं म्हणत नितेश राणे यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे आता शिवसेनेकडून या टीकेला काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात राणे कुटुंबीयांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. आज काहीजण केवळ माझं भाषण संपण्याची वाट पाहत असतील. भाषण कधी थांबतंय आणि कधी एकदा चिरकतोय, अशी काहींची अवस्था आहे. कारण शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणं, चिरकणं यातून त्यांना रोजगार मिळतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले. केवळ तुमची पालखी वाहत नाही म्हणून शिवसेना भ्रष्टाचारी झाल्याचे आरोप होत आहेत. मागेही सांगितलं आम्ही पालखीचे भोई आहोत. जरूर आहोत. पण ती आमची राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीची पालखी आहे. हिंदुत्वाची पालखी आहे. तुमची पालखी वाहणारे आम्ही भोई नाही आहोत. तुमच्या पक्षाच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसैनिकांचा जन्म झाला नाही. देव, देश आणि धर्मासाठी जन्म झाला आहे. तो शिवसैनिक तुम्ही भ्रष्ट ठरवत आहात? का तर तुमच्या पालख्या वाहत नाही म्हणून? वाईट काळात शिवसैनिक चालत होता. आता मात्र चालत नाही. हर्षवर्धन पाटील तुमच्यात आले तर पवित्र झाले. गटाराचं पाणी तुमच्यात टाकलं तर गंगा. ते पाणी दुसरीकडे टाकलं तर गटारगंगा. ही जी काही थेरं सुरू आहेत ते हिंदुत्व नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.