जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एमआयडीसी परिसरातील गुरुदेव नगरातील ठेवलेल्या मे. संतोष ट्रेडर्स नावाच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने सोमवारी छापेमारी केली. याठिकाणाहून राज्यात प्रतिबंधित असलेला सुमारे २१ लाख ९ हजार ६५० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी गोदाम मालक अरुण पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एमआयडीसी परिसरातील बुलेट शोरुमच्या मागील बाजूस असलेल्या गुरुदेव नगरातील एका गोदामामध्ये गुटख्याची साठवणुक केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी शरद पवार यांना मिळाली. त्यांच्यासोबत भरारी पथकातील नागपुर येथील सहाय्यक आयुक्त रो. रा. शहा, अन्न सुरक्षा अधिकारी ल. प्र. सोयाम, आर. बी. यादव, जी. बी. मोरे, आर. एस. वाकडे, आर. डी. सोळंके हे उपस्थित होते. पथक दि. २४ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कारवाईसाठी रवाना झाले. या पथकासोबत एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचारी राहुल रगडे व विशाल कोळी हे देखील होते. गॅस कटरने कुलूप तोडून केला प्रवेश पथकाने गोदाम मालकाशी संपर्क केला, मात्र ते हजर न राहिल्यामुळे गॅस कटरने गोदामाचे कुलूप तोडन पथकाने गोदामात प्रवेश केला. यावेळी त्यांना गोदामातील हजेरी रजिस्टरवर मे. संतोष ट्रेडर्सचे गोदाम, व तेथे मिळालेल्या एका क्लिनिकच्या फाईलवर अरुण पाटील यांचे नाव लिहलेले आढळून आले.
एमआयडीसी परिसरात असलेल्या बुलेट शोरुमच्या मागील बाजूस असलेल्या गोदामातून संपुर्ण शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये गुटख्याची विक्री केली जाते. याठिकाणी अनेकदा कारवाई करण्यात आली मात्र गोदाम मालकाचे पोलिसांसोबत असलेल्या संबंधामुळे त्याच्याविरुद्ध एकदाही गुन्हा दाखल झालेला नव्हता. मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत २१ लाखांचा गुटखा जप्त करुन गोदाम मालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
भरारी पथकाने गोदामात छापा टाकण्यापुर्वी चोपडा मार्केटमधील मे. संतोष ट्रेडर्सचे मालक अरुण पाटील यांच्या दुकानाची तपासणी केली. त्यानंतर पथकाने एमआयडीसीतील गोदामावर छापा टाकून तेथील तपासणी केली. पथकाला याठिकाणी राज्यात प्रतिबंधित असलेला विविध कंपन्यांचा सुमारे २१ लाख ९ हजार ६५० रुपयांचा गुटखा मिळून आला. जप्त केलेला गुटखा जप्त करणयात आला असून गोदामाला सील ठोकण्यात आले आहे. याप्रकरणी गोदाम मालक अस्मा पाटील रा. दादावाडी यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.