जालना (वृत्तसंस्था) येथील राजूपत हॉस्पिटलच्या आलिशान इमारतीमध्ये सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात केंद्रावर शनिवारी (दि. ६) पाच वाजेच्या सुमारास जिल्हा शल्यचिकित्सकांच्या जंबो पथकाने पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. या ठिकाणी एका महिलेचे गर्भलिंग निदान केले जात असतानाच ही कारवाई करण्यात आली.
डॉ. दिलीपसिंग राजपूत असे गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरचे नाव असून, तो बीएचएमएस डिग्रीधारक डॉक्टर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत पथकाने गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन, गोळ्यांचा मोठा साठा, दोन पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, राज्यभरातील एजंटच्या नावांच्या डायऱ्या, लाखो रुपयांची रोकड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
भोकरदन शहरातील राजपूत हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये मागील काही महिन्यांपासून अवैधरीत्या गर्भलिंग निदान केले जात असल्याची गोपनीय माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांना मिळाली होती. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाकडून मागील काही दिवसांपासून या इमारतीवर पाळत ठेवली जात होती. दरम्यान, आज एका महिलेला गर्भलिंग निदानासाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यामुळे आरोग्य विभागाचे पथक सकाळपासूनच लक्ष ठेवून होते. दरम्यान, दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एका महिलेचे अवैध गर्भलिंग निदान केले जात असल्याची खात्री झाल्यानंतर पथकाने या इमारतीमध्ये छापा टाकला.
या छापेमारीमध्ये आरोग्य विभागाला मोठे घबाड सापडले. यामध्ये दोन सोनोग्राफी मशीन, एक अलमारी भरून औषध-गोळ्या, रोख रक्कम, गर्भपातासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन, असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली. या ठिकाणी आलेल्या महिला रुग्णाचा अवैधरीत्या गर्भलिंग निदान केले जात असल्याचा जबाब नोंदवल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत आरोग्य विभाग तसेच पोलिसांच्या पथकाने सापडलेल्या मुद्देमालाचा पंचनामा केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. व्ही. जे. घोलप, नोडल अधिकारी डॉ. वाकोडे, डॉ. कांबळे, मनोज जाधव, अविनाश जाधव, भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे, हसनाबाद ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अहिरे, भोकरदन ठाण्याचे पोलीस अधिकारी बालाजी वैद्य आदींनी ही कारवाई केली.
सिल्लोड येथे काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात केंद्राचा भंडाफोड झाला होता. त्याचे धागेदोरे भोकरदन शहरापर्यंत पोहोचले होते. दरम्यान, डॉ. दिलीपसिंग राजपूत हा सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात कम्पाऊंडर म्हणून काम करत होता. त्यानंतर त्याने एका खासगी रुग्णालयाच्या मागे मोठी इमारत बांधून अवैधरीत्या गर्भलिंग निदान व गर्भपात केंद्र सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या ठिकाणी असलेला कर्मचारी नवीनच भरती केलेला असल्याची माहिती समोर आली आहे. कारवाईची कुणकुण लागताच डॉ. दिलीपसिंग राजपूत फरार झाला असल्याचे कळते.