नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय रेल्वेच्या आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर त्याला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी काही ठिकाणी लाठीचार्ज केला. तर काही ठिकाणी हवेत गोळीबार करण्यात आला. दरम्यान, गयामध्ये उद्रेक झालेल्या तरूणांनी प्रजासत्ताक दिनी दगडफेक करत ट्रेनला आग लावल्याचीही घटना घडली.
रेल्वे भरती मंडळाच्या नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत बिहारमधील उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. काही काळाने हा विरोध आणखी तीव्र झाला. काही ठिकाणी रेल्वे आडवण्यात आल्या तर काहींनी दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणार आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅकवर येत ट्रेन आडवण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी पोलिसांना विरोध दर्शवण्यात आला.
गया जंक्शनवर पोहोचलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. उपद्रवी विद्यार्थ्यांनी प्रथम गया जंक्शनवर ‘श्रमजीवी एक्सप्रेस’वर दगडफेक केली आणि अनेक ठिकाणी तोडफोड केली. पोलिसांवरही दगड फेकले. यानंतर पोलिसांनी संतप्त विद्यार्थ्यांचा पाठलाग केल्यावर गया स्टेशनला लागून आधीच उभ्या असलेल्या ट्रेनच्या बोगीलाही आग लावण्यात आली.
सीतामढी, मुझफ्फरपूर, नवाडा, बिहारशरीफ, आरा, बक्सर आणि भाबुआ येथे झालेल्या गोंधळामुळे रेल्वे वाहतूकीला फटका बसला आहे. आणि रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान झालंय. पाटणा, समस्तीपूर आणि छपरा येथेही निदर्शने करण्यात आली. सीतामढीमध्ये दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्या जमावाला पोलिसांनी हवेत गोळीबार करून हटवलंय. तर नवाडा येथे सर्वाधिक नुकसान झाल्याचं समोर आलंय.
गया जंक्शनवर गोंधळ निर्माण केल्यानंतर, दंगलखोर विद्यार्थ्यांनी करीमगंजजवळ आधीच उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनला लक्ष्य केलं आणि एक बोगी पेटवली, यामुळे आता ट्रेनची बोगी जळून खाक झालीय. संबंधित प्रकणारचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस व रेल्वे पोलिसांनी एकत्र कारवाई केली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती गयाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आदित्य कुमार यांनी दिली.















