मुंबई (वृत्तसंस्था) आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अटकेत असलेले रवी राणा आणि नवनीत राणा यांना आज न्यायालायात हजर करण्यात आले होते. आज सुनावणीनंतर राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालायीन कोठडी सुनावण्यात आली आहे (Navneet Rana send to judicial custody).
अटक केल्यानंतर दोघांची वैद्यकीय चाचणी झाली आणि अखेर दाम्पत्याला वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं. आज तातडीने सुनावणी करण्यासाठी सुट्टीच्या कोर्टाचा पर्याय होता. त्यासाठी १२.३० नंतर सुनावणी पार पडली. त्यात राणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
वांद्रे न्यायालयात न्यायदंडाधिकारी ए. ए. धानीवाले यांनी सुनावणी घेतली. हे सुट्टीचे न्यायालय असून धानीवाले हे विशेष दंडाधिकारी आहेत. अॅड. रिझवान मर्चंट यांनी राणांची बाजू मांडली. मुंबई पोलिसांची कारवाई बेकायदेशीर असल्याचं राणांच्या वकिलांनी सांगितलं. यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. येत्या २९ एप्रिलला या प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. नियमित दंडाधिकाऱ्यांचं कोर्ट कार्यरत झाल्यावर जामीनावर सुनावणी होणार आहे. पाच दिवसांनी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
राणांना गुन्हा करत असल्याची पूर्वकल्पना होती
राणा दाम्पत्यावर आयपीसी १५३ ए नुसार कारवाई केली आहे. एखादी व्यक्ती समाजात द्वेष पसरणारं वक्तव्य करते, दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल, आणि त्याला चिथावणी मिळेल असं कृत्य करते, त्यावेळी हे कलम लावण्यात आलं आहे. यासोबत आयपीसी ३४ आणि ३७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कलमांनुसार आरोपीला आपण केलेली कृती समाजाच्या शांततेविरोधात आणि कायदा व सुव्यवस्थेला धक्का लागू शकतो, याची जाणीव असतानाही कृत्य केल्यास ही कलमं दाखल होतात.