मुंबई (वृत्तसंस्था) राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरूंगात असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) या दाम्पत्याची सरकारने कुंडलीच बाहेर काढली आहे. दोघांवर ठिकठिकाणी एकूण 21 गुन्हे दाखल असून त्यातील काही गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, अशी मागणी सरकारच्यावतीने न्यायालयात करण्यात आली आहे.
राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज (ता. 29) सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारच्यावतीने अॅड. प्रदीप घरत (Pradeep Gharat) यांनी न्यायालयात लेखी स्वरूपात सरकारची बाजू सादर केली. तर राणांच्या वतीने त्यांच्या वकीलांनीही जामीनाची मागणी करत बेकायदेशीरपणे त्यांना अटक केल्याचे सांगितले. पण न्यायालयाने आता यावर शनिवारीही सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे राणांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. शनिवारी सरकारच्यावतीने युक्तीवाद केला जाणार आहे.
अॅड. प्रदीप घरत यांनी सांगितले की, आज लेखी युक्तीवाद सादर केला आहे. त्यानंतर न्यायालय जी तारीख देईल. त्यानुसार आम्ही युक्तीवाद करू. त्यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. पण त्यांच्याविरोधातील कलम गंभीर आहे. राजद्रोहाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा आहे. त्यांना जामीन झाला तर दबाव येऊ शकतो. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. रवी राणा यांच्याविरोधात 17 आणि नवनीत राणा यांच्याविरोधा सहा गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. नवनीत राणा यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रांचा गुन्हा आहे. बोरीवली येथून त्यांनी खोटा शाळेचा दाखला मिळवला होता. हे मुद्दे न्यायालयासमोर मांडून जामीनाला विरोध केला जाणार असल्याचे घरत यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. त्यासाठी आदल्यादिवशी ते दोघेही त्यांच्या खार येथील निवासस्थानी आले होते. पण पोलिसांनी त्यांना मातोश्रीसमोर न जाण्याची नोटीस बजावली होती. पण यादरम्यान शिवसैनिकांच्या राणांच्या घरासमोर जोरदार आंदोलन केले. दिवसभर मोठा राडा झाला होता. यादरम्यान पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याठिकाणी घरचं जेवण मिळावं, अशी मागणी राणांनी गुरूवारी न्यायालयात केली आहे.
















