कोल्हापूर (वृत्तसंस्था) कराड जनता सहकारी बँकचा परवाना रद्द करण्याची घटना ताजी असताना आता कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेनं रद्द केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवान रद्द केला.
भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवान रद्द केला आहे. सलग दोन तिमाहींमध्ये किमान नेटवर्थची मर्यादा पाळू न शकल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तसंच बँकेच्या कार्य पद्धतीवर बोट ठेवून हा परवाना रद्द करण्यात आला आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने कराड जनता सहकारी बँकेचं लायसन्स रद्द केलं होतं. सुभद्रा लोकल एरिया बँकेने २०१९-२०२० या आर्थिक वर्षातील दोन तिमाहीममध्ये किमान नेटवर्थच्या मर्यादेचं उल्लंघन केलं. तसेच बँकेकडे ठेवीदारांचे पैसे परत करण्याएवढीही रक्कम शिल्लक नसल्याने या बँकेचं लायसन्स रद्द करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. ज्या पद्धतीने बँकेचं काम सुरू होतं, त्यानुसार सध्याच्या घडीला आणि भविष्यात ग्राहकांचं मोठं नुकसान झालं असतं, असा ठपकाही बँकेने ठेवला आहे. रिझर्व्ह बँकेने केलेल्या कारवाईमुळे बँकेत ठेवी असणाऱ्या ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला आहे. सुभद्रा लोकल एरिया बँकेचं कामकाज २४ डिसेंबर रोजी संपल्यानंतर त्या क्षणापासून त्यांचं लायसन्स रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे बँकेला कोणतीही देवाण-घेवाण करता येणार नाही, असं रिझर्व्ह बँकेने निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक सुभद्रा लोकल एरिया बँकेच्या एकूण कामकाजाचा लेखाजोखा उच्च न्यायालयात सादर करणार आहे. त्यामुळे बँकेची सध्याची पत आणि आर्थिक डबघाई अधिक स्पष्ट होणार आहे. रिझर्व्ह बँकेने सुभद्रा एरिया लोकल बँकेवर बँक रेग्युलेटिंग अॅक्ट १९४९च्या सेक्शन २२ (४) अंतर्गत ही कारवाई केली आहे. त्यामुळे यापुढे बँक नियमन कायदा ५ (ब) नुसार बँकेला यापुढे कसलाही व्यवहार करता येणार नाही.
कराड जनता बँकेचाही परवाना रद्द झाला होता
२०१७ मध्ये कराड शहर पोलिसात जनता बँकेच्या संचालक मंडळासह काही अधिकाऱ्यांवर ३१० कोटींच्या अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. यानंतर ६ ऑगस्ट २०१९ रोजी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर निर्बंध लादण्यात आले होते. या निर्बंधांनंतर कराड जनता सहकारी बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. बँकेबाबत अनेक आक्षेपार्ह गोष्टी समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने ही बँकिंग परवाना रद्द करण्याची कारवाई केली.