छत्रपती संभाजी नगर (वृत्तसंस्था) बटईने घेतलेल्या शेतात एका शेतकरी दाम्पत्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (२८) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रांजणगाव खुरी (ता. पैठण) उघडकीस आली. राजू खंडागळे (२७) व अर्चना खंडागळे (२३) असे या दाम्पत्याचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.
पती-पत्नी शेतात गेले मात्र, घरी परतलेच नाही !
राजू खंडागळे यांनी गावातील एका शेतकऱ्याची शेती बटाईने केली होती. तसेच फावल्या वेळात ते मोलमजुरी करीत होते. शुक्रवारी दोघेही पती पत्नी शेतात गेले होते. परंतु अंधार पडल्यानंतरही दोघे घरी परतले नाहीत. शिवाय ते फोनही उचलत नसल्याने राजूच्या घरच्यांनी शेतात धाव घेतली. त्यावेळी दोघांनीही झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आले. ही माहिती मिळताच पोलिस पाटील हरिश्चंद्र लघाने व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही बिडकीन शासकीय रुग्णालयात हलविले; मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट !
माहिती मिळताच बिडकीन ठाण्याचे पोनि. गणेश सुरवसे, बीट जमादार एस. व्ही. वाघमारे यांनी रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, आर्थिक तंगीमुळे संसारात ओढाताण होत होती. यामुळे पती-पत्नी नैराश्यात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परंतू आत्महत्येचे नेमकं कारण अद्यापही समजू शकले नाही. प्रकरणाचा तपास बिट जमादार एस. व्ही. वाघमारे करत आहेत.
दोन मुली झाल्या पोरक्या !
आत्महत्याग्रस्त दाम्पत्याला एक चार वर्षांची तर दुसरी दीड वर्षांची अशा दोन गोंडस मुली आहेत. आई-वडिलांनी आत्महत्या केल्याने काहीच न कळण्याच्या वयात या मुली पोरक्या झाल्या. घटनेनंतर त्या सैरभरपणे एकमेकांकडेप पाहत असल्याने त्यांच्या नातेवाइकांसह उपस्थितांना अश्रू आवरता आले नाहीत. लहान वयात मुलींचे माता पित्याचे छत्र हरवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दाम्पत्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.