जळगाव (सुरेश उज्जैनवाल) महाराष्ट्राचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा आज वाढदिवस…जळगावच्या असंख्य जनतेच्या हृदयात स्थायी स्वरूपात गेली चार दशकेअधिराज्य गाजवलेले दादा केवळ नेतेच नव्हे, तर सर्वसामान्यांचे विद्रोही जननायक होत… प्रचलित व्यवस्था व राजकारणाच्या प्रवाहाविरूद्ध सिंगल आर्मी म्हणून लढलेल्या या जळगावच्या अनभिषिक्त सम्राटास वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा अन् अभिष्टचिंतन…!
सार्वजनिक क्षेत्रात बरे वाईट प्रसंग राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाच्या वाट्याला येतात, टीका टिप्पणी सह आरोप-प्रत्यारोपाचा भडिमार ही सहन करावा लागतो. मात्र त्याची किंचितही परवा न करता चार दशके राजकीय वाटचाल केलेल्या दादांमधील प्रखर विद्रोही व्यक्तीमत्वावर पत्रकार म्हणून टाकलेला हा प्रकाशझोत…
दादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या राजकीय प्रवासातील थक्क करणारे काही प्रसंग..
अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाचा शाश्वत अजेंडा घेऊन १९८० मध्ये लोकप्रतिनिधी म्हणून पुढे येतो आणि तब्बल दहा वेळा विधानसभेची निवडणूक जिंकतो, त्यातही तीन निवडणुका भूमिका बदलून लढतो आणि जिंकतोही. महाराष्ट्राच्या राजकारणातील हे एक दुर्मिळ आणि असामान्य उदाहरण म्हणता येईल. त्यांच्या राजकीय वाटचालीची तटस्थपणे समीक्षा केल्यास असे दिसून येते की, दादांना राजकीय पक्षाच्या लेबलची गरजच नव्हती. जळगावच्या तमाम जनतेत ते पक्षापेक्षा व्यक्ती म्हणूनच अधिक प्रिय राहिले आणि आजही आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही. गेल्या ३५ ते ४० वर्षात असा एक ही प्रमुख राजकीय पक्ष नाही, की त्या पक्षाकडून या माणसाचा राजकीय छळ केला गेला नाही, त्यातही भाजप कडून केला गेलेला छळ पराकोटीचा व व्यक्तीद्वेषाचा होता. अशाही परिस्थितीत दादांनी प्रखर विरोधाचा सामना करीत जळगावच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची १७ मजली इमारत सरकारच्या कोणत्याही मदतीशिवाय दिमाखात उभी केली, हे देखील विकासाचे राज्यातील एकमेव अफलातून उदाहरण म्हणता येईल. सुरेशदादा यांना राजकीयदृष्ट्या नामोहरम करण्याची सुरवात १९९१ पासून सुरू झाली. किंबहुना तसा कार्यक्रमच जिल्ह्यातील काही विरोधी नेत्यांनी सेट केला.
जळगावच्या भल्यासाठी केलेला विद्रोह….
शहराच्या मध्यवर्ती भागात सेंट्रल फुले मार्केट महाप्रकल्प, डेली बाजाराच्या जागेवर भव्य असे भिकमचंद जैन मार्केट, व.वा. अर्थात गोलानी मार्केट, गांधी मार्केट यासह लहान मोठी 18 व्यापारी संकुले उभारून शहरातील उद्योग, व्यापारास चालना देण्यासह दहा हजारांपेक्षा जास्त नवीन रोजगार निर्मिती केली. शहरातील अतिक्रमण हटविण्याचा विषय असो की सार्वजनिक विकासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नात दादांनी तडजोड तर केलीच नाही, पण प्रसंगी प्रशासन, शासनाशी थेट भिडण्याचीही हिम्मत दाखविली. अर्थात यासाठी वेळोवेळी शारीरिक, मानसिक, आर्थिक किंमतही मोजली. तथापि जळगाववासीयांची भक्कम साथ या नैतिक बळाच्या जोरावरच ते मार्गक्रमण करीत राहिले.
जळगाव शहराच्या लौकिकास बाधा पोहचविणाऱ्यांना त्यांनी नेहमीच सडेतोड उत्तर दिले, १९९४ मधील कथित लैगिक छळ प्रकरणी त्यांनी घेतलेली भूमिका हे त्यांच्या स्वभाववैशिष्टयाचे बोलके उदाहरण म्हणता येईल. निर्भीड, स्पष्टवक्तेपणा व जळगाव शहरवासीयांशी असलेली बांधिलकीबाबत दुसरा राजकीय नेता पर्याय म्हणून दृष्टिपथात अद्याप तरी दिसून येत नाही. जळगाव शहरात सन १९९३ -१९९४ मध्ये टपरी प्रकरण कथित लैगिंक छळ प्रकरणा वरून जळगाव पालिका जुलै १९९४ मध्ये राज्य सरकारने बरखास्त केली, मात्र काही महिन्यानंतर झालेल्या पालिका निवडणुकीत सुरेशदादा यांच्या नेतृत्वाखाली आघाडीला निर्विवाद बहुमत मिळाले. जनतेने सुरेशदादा यांच्यावर विश्वास व्यक्त करीत राज्य सरकारच्या निर्णयास एका प्रकारे चपराक दिली.
स्वार्थी राजकरण्यांनी जळगावची दुर्दशा केली
आज जळगाव शहराची पार दुर्दशा झाली आहे. २५ वर्षांपूर्वी ज्या शहराची विकास कामे, प्रकल्प पहाण्यासाठी देशभरतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी मंडळ भेट देऊन दादांच्या दूरदृष्टी व विकास कामांची स्तुती करीत होते. त्या शहराची स्वार्थी राजकारण्यांनी आज बकाल अवस्था करून ठेवली आहे. प्रामुख्याने दुसऱ्या तालुक्यातून येऊन जळगावात राजकारण करण्यासाठी आलेल्या काही लोकप्रतिनिधींमुळे शहराची दुर्दशा झाली आहे, याची जाणीव शहरवासीयांना ही होऊ लागली आहे.
सुरेश उज्जैनवाल
पत्रकार, जळगाव
८८८८८८९०१४