नागपूर (वृत्तसंस्था) राज्यभरातील ३०० सहायक पोलीस निरीक्षकांना दिलासा मिळाला आहे. गृहमंत्रालयाने त्यांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरू केली असून पोलीस निरीक्षक पदासाठी पदोन्नतीच्या कक्षेत असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
कोरोना आणि प्रशासकीय कारणांमुळे पोलीस विभागासह अन्य विभागाच्या पदोन्नत्या रखडल्या होत्या. त्यामुळे पदोन्नतीच्या कक्षेत असलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती. यापूर्वी बदलीसाठी प्रयत्नात असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदरी निराशा आली होती. आता पदोन्नतीची प्रक्रिया सुरू झाल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. पदोन्नती मिळताच पसंतीच्या शहरात बदली मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्नात आहेत. येत्या १५ दिवसांत निवड यादीत नावे असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांना संवर्ग मागवण्यात येणार आहे. संवर्ग स्वीकारल्यानंतर अंतिम यादी लवकरच जाहीर केली जाणार असून सहायक निरीक्षकांना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सहायक निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांची सध्याच्या नेमणुकीच्या ठिकाणावरून इतरत्र बदली होईल. अशातच, जुलै महिन्यात राज्यभरातील शाळा, महाविद्यालयेही सुरू होतील. यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना मुलांच्या शाळेचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता आहे. शिवाय, एका शहरातून दुसऱ्या शहरात आपल्या कुटुंबाचे स्थलांतर करण्याची कसरतही या अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वी पदोन्नतीची अंतिम यादी जाहीर झाल्यास ते त्यांच्यासाठी सोयीचे ठरेल.