नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बँकांनी जनधन खातेधारकांना मोठा दिलासा देताना खात्यात रक्कम जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या जनधन खात्यांवर किमान शिल्लक ठेवण्याचेही कोणतेही बंधन नाही.
सर्वसाधारण बचत खात्यांवरही कोणत्याही प्रकारे शुल्क आकारण्यात येणार नसल्याचेही बँकांनी स्पष्ट केले आहे. करोनाकाळात बँकांमध्ये जनधन खाती उघडण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. स्टेट बँकेच्या एका अहवालानुसार जनधन खाती उघडण्याचे प्रमाण ६० टक्क्यांनी वाढले आहे. १ एप्रिल ते १४ ऑक्टोबर दरम्यान जवळपास तीन कोटी नवी खाती उघडण्यात आली आहेत. याशिवाय या कालावधीत ११,६०० कोटी रुपये या खात्यांमध्ये जमा झाले आहेत. त्यामुळे जनधन खात्यांची एकूण संख्या ४१.०५ कोटींवर गेली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आणि खासगी क्षेत्रातील काही बँकांनी जनधन खात्यांमध्ये रोख रक्कम भरण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क लावण्यात आल्याची अफवा पसरली होती. मात्र, हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचे केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. जनधन खात्यातील बँकिंग सेवांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. सर्व बँका रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे पालन करत आहेत. त्यानुसार जनधन खात्यांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. सर्व बँका रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे पालन करत आहेत. त्यानुसार जनधन खात्यांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.