जळगाव (प्रतिनिधी) यशराज फिल्मतर्फे हिंदू सम्राट, महावीर पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माण करीत आहे. परंतु, निर्माता, निर्देशक, लेखकाने या चित्रपटाला योग्य तथा सन्मानपूर्वक नाव दिलेले नाही. तर महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख केला आहे. या चित्रपटाला ‘सम्राट पृथ्वीराज चौहान’असे नाव देऊन इतिहास योग्यरित्या मांडण्यात यावा, अशी मागणी श्री राजपूत करणी सेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, या चित्रपटाला सन्मानपूर्वक नाव न दिल्यामुळे विशेषत: राजपूत समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकारामुळे समाजबांधवांना भडकवण्यात येत असल्याची तक्रार आहे. या चित्रपटाचे निर्देशक व लेखक ‘चाणक्य’ फेम डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी आहेत. यात अक्षयकुमार, संजय दत्त, सोनू सूद सारखे दिग्गज कलाकार अभिनय करीत आहेत. तर या चित्रपटाच्या माध्यमातून माजी विश्वसुंदरी मानुषी चिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. या चित्रपटाला सन्मानपूर्वक नाव देणे आवश्यक होते. मात्र, सन्मानपूर्वक नाव न देता एकेरी भाषेचा उल्लेख केला आहे. राजपूत समाजबांधव महाराजांना देव मानतात. महाराज सर्व भारतीयांना वंदनीय आहेत. या चित्रपटाला ‘सम्राट पृथ्वीराज चौहान’असे नाव देण्यात यावे. इतिहासाची तोडफोड न करता योग्यरित्या दाखविण्यात यावा. अन्यथा राजपूतसह हिंदू बांधव या चित्रपटाला सिनेमागृहात प्रसारित होऊ देणार नाहीत, असा इशारा श्री राजपूत करणी सेनेतर्फे देण्यात आला आहे.
या निवेदनावर खान्देश विभागीय अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील व जिल्हा प्रमुख विठ्ठलसिंग मोरे यांच्या स्वाक्षर्या आहेत. निवेदन देताना खान्देश कार्याध्यक्ष विलाससिंग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष आशिष हाडा, बी.एच.खंडाळकर, जिल्हा संघटक गणेश दरबारसिंग राजपूत, युवकचे खान्देश विभागीय अध्यक्ष बापूसिंह राणा, युवकचे जिल्हाध्यक्ष रंजनसिंह राजपूत, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल राजपूत, महिला अध्यक्ष आशा राजपूत, जळगाव शहर प्रमुख अतुलसिंह राजपूत, शहर संघटक ज्ञानेश्वर राजपूत आदी उपस्थित होते.