मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच ख्रिसमस आणि न्यू ईयरच्या सेलिब्रेशनला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यू ईयर आणि ख्रिसमससाठीची मुंबई महापालिकेची नियमावली २० तारखेपूर्वी जाहीर होणार आहे. यात ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनवर निर्बंध येण्याची शक्यता आहे.
मुंबईकरांनी गर्दी करू नये आणि कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मुंबई महापालिका यानिमित्ताने येत्या २० डिसेंबर रोजी नवी नियमावली जाहीर करणार आहे. त्यामुळे ख्रिसमस आणि न्यू ईयर निमित्ताने होणाऱ्या सार्वजनिक आणि सामुदायिक जल्लोषाला यंदा प्रथमच ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच मरीन ड्राईव्ह, सीफेस यासह इतर सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रेशन करता येणार नाही. नाईट क्लब, हॉटेल्ससाठीही कडक नियम बनवले जाऊ शकतात. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी हा बाबतची माहिती दिली. न्यू ईयर आणि ख्रिसमसच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र येऊन सेलिब्रेशन करता येणार नाही. येत्या २० डिसेंबर रोजी ही नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याचं काकाणी यांनी सांगितलं. दिवाळीप्रमाणे ख्रिसमस आणि न्यू ईयरला मरीन ड्राईव्ह, वरळी सी-फेससह मुंबईतील इतर चौपाट्यांवर एकत्र येऊन जल्लोष करण्यास मनाई करण्यात येणार आहे. चौपाट्यांवर हजारोंचा जमाव जमू नये म्हणून मुंबई महापालिकेने या हालचाली सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच नाईट क्लब आणि हॉटेल्ससाठीही कडक नियम लागू करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर हॉटेलमधील स्टाफसाठीही नियमावली लागू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितलं. तसेच कोरोना असो वा नसो मास्क घालणं बंधनकारकच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.