जळगाव (प्रतिनिधी) माहिती देण्यास टाळाटाळ केल्याच्या निषेधार्थ माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी जिल्हा परिषदमध्ये आज सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
या संदर्भात अधिक असे की, माहिती देण्यास टाळाटाळ करून खरेदी प्रक्रिया व मनुष्यबळ भरती प्रक्रियेत भष्टाचार तसेच गैरव्यवहार लपवत असल्याने डॉ. सचिन भायेकर (जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, जळगाव) हे माहिती उपलब्ध करुन देत नाही, तोपर्यत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाच्या बाहेर आजपासून माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. दिनेश भोळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून जिल्हा आरोग्य अधिकारी विभागात वेगवेगळ्या विषयाबाबत संबंधित यंत्रणेला माहिती मिळवण्यासाठी रितसर माहिती अधिकारात अर्ज तसे अपील केले असता तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत साहेबांनी वेळोवेळी सुचित करुनही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर हे मनमानी करुन माहिती देण्यासाठी टाळटाळ करीत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
सबंधित माहिती ही राष्ट्रीय आरोग्य अभियान या यंत्रणेशी निगडित असून त्यात करोडो रुपयांचा निधी शासनाकडून जिल्ह्यातील आरोग्य विभागावर खर्च करण्यासाठी दिलेला असतो. यात सर्व कर्मचारी है कंत्राटी नियुक्तीवर असल्याने नियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी यांच्या माध्यमातून खर्च केला जातो. सबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामावरील खर्च, व साहित्य खरेदी साठी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे निधी खर्च झाल्याने व चुकीच्या पद्धतीने मनुष्यबळाची भरती केल्याने संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी यांचा भ्रष्टाचार, गैरव्यवहार उघड होणार आहे. त्यामुळे यंत्रणेकडून माहिती देण्यासाठी टाळटाळ करण्यात येत आहे. जोपर्यंत माझ्या सर्व अर्जाची माहिती मला परीपूर्ण मिळत नाही तोपर्यंत दि. १५ एप्रिल वेळ सकाळी १० वाजेपासून शासकीय कामकाजाच्या वेळेत मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या दालनाच्या बाहेर शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन करणार असल्याचेही श्री. भोळे यांनी म्हटले आहे.