चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील मालेगाव रोडवरील गॅस एजन्सीत भामट्याने दरोडा टाकत चाकूचा धाक दाखवून रोकडसह एकूण ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल घेऊन पसार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात भावेश मनोज माखोजा (वय २०-२२ अंदाजे रा. उल्हासनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, चाळीसगाव शहरातील शांतीनगर येथील अशोक किसनचंद छावडीया (वय ५८) हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास असून ते मालेगाव रोडवरील एच.पी. गॅस एजन्सीत कामाला आहेत. या एजन्सीत दिवसभरात झालेल्या गॅस विक्रीचे पैसे सायंकाळी डिलीव्हरी बॉयकडून घेऊन दुसऱ्या दिवशी बँकेत भरणा करण्याचे काम छावडीया हे करीत असतात. दरम्यान २५ एप्रिल रोजी रात्री रात्री ८:३० वाजताच्या सुमारास छावडीया हे नेहमीप्रमाणे डिलीव्हरी वॉयकडून पैसे घेऊन मोजत होते. तेवढ्यात दुकानाचा शटर वर करून भावेश मनोज माखोजा (वय २०-२२ अंदाजे) रा. उल्हासनगर हा चाकू घेऊन मध्ये आला. छाबडीया यांना किरकोळ दुखापत करून पैसे दे अन्यथा जीवे ठार मारण्याची धमकी देऊन ३,६५,००० हजार रोकड व ७५ हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी (क्र. एम. एच. १९ डीएक्स २९१२) असे एकूण ४,४०,००० रूपये घेऊन पळ काढला. याप्रकरणी छावडीया यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भावेश मनोज माखोजा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि विशाल टकले हे करीत आहेत.














