चाळीसगाव (प्रतिनिधी) कन्नड रस्त्यावर रांजनगाव फाटा परिसरात रविवारी पहाट अज्ञात इसमांनी डॉक्टर व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करून तब्बल १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील डॉ. योगेश नेताजी पाटील (वय ३८) हे कुटुंबीयांसह त्यांच्या सुझुकी बलेनो कारने (क्र. एमएच १९ सीव्ही ६४८६ पुणे येथे जात होते. पहाटे सुमारास रांजनगाव फाट्याजवळ त्यांच्या गाडीखाली काहीतरी अवजड
वस्तू लागल्याने त्यांनी वाहन थांबवले. त्याचवेळी ७ ते ८ अज्ञात इसम हातात लाकडी काठ्या घेऊन त्यांच्या दिशेने धावत आले आणि त्यांनी डॉक्टर पाटील व त्यांच्या नातेवाईकांना मारहाण करून जबरीने ऐवज हिसकावून नेला. या दरोड्यात सोन्याचे व चांदीचे दागिने, मोबाईल फोन, व रोख रक्कम असा एकूण सुमारे १,२०,००० किमतीचा ऐवज लुटण्यात आला. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, याच परिसरात काही वेळापूर्वी लातूर येथून उज्जैनकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या गाडीखालीही लोखंडी जॅक फेकल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात ७ ते ८ इसमांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू आहे.
 
	    	
 
















