जळगाव (प्रतिनिधी) येथील जी.एम. फाऊंडेशन येथे आज गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी गिरीश महाजन यांनी आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्यावर जोरदार टीका केलीये. जिल्ह्यातीलच काय, राज्यातील साखर कारखाने केवळ पवार कुंटूंबियांकडेच असावेत, रोहित पवार यांचा जळगाव दौरा देखील यासाठीच असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला.
जळगाव जिल्ह्यात नुकताच राष्ट्रवादीचे युवा नेते आ. रोहीत पवार यांचा दौरा झाला. याबाबत गिरीश महाजन यांना विचारले असता, राज्यातील सर्वच साखर कारखाने पवार कुंटूंबियांकडेच असून, आता जळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठी देखील हाच प्रयत्न असल्याने त्यासाठीच त्यांचा दौरा असल्याचा आरोप महाजन यांनी केला.
यावेळी गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावरही टीका केली. यांनी मला पाडले त्यांनी मला पाडले असे आरोप करतात, तुमची योग्यता तर मुख्यमंत्री पदाची होती ना मग निवडणुकीत पडले कसे? साधी कोथळी ग्रामपंचायत तुम्हाला राखता आली नाही, अशा शब्दात महाजन यांनी खडसेंवर निशाणा साधला.
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलच्या नावाने भाजपाला गाफिल ठेवून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने घात केल्याचा आरोप महाजन यांनी केला. तसेच निवडणुक लोकशाही मार्गाने न लढविता आपले उमेदवार बिनविरोध करण्यासाठी सत्तेचा दुरपयोग करीत भाजपाच्या उमेदवारी अर्जांमधील कागदपत्रे गहाळ करुन चिटींग केली जात असल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगितले.