जळगाव (प्रतिनिधी) रोटरी क्लबची शंभर टक्के पोलिओ निर्मूलन ही प्राथमिकता असून सेवाभावी कार्यांद्वारे समाजाच्या गरजा पूर्ण करतांना रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीनसिटी सुद्धा स्वच्छ पाणी,शिक्षण आणि आरोग्य यासारख्या प्रमुख क्षेत्रात मूल्याधिष्टीत काम करेल,असा विश्वास रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांनी व्यक्त केला.
मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे आज शनिवार,१० जानेवारी रोजी येथे नव्याने अकरावा क्लब म्हणून स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीनसिटीच्या संस्थापक अध्यक्षा कु.धनश्री विवेक ठाकरे यांना कॉलर,पिन व चार्टर प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या शुभहस्ते सुपूर्द झाले. यावेळी व्यासपीठावर सहप्रांतपाल सचिन जेठवाणी,रोटरी रॉयल्सच्या आयपीपी वर्षा रंगलानी,सचिव गणेश वर्मा,स्नेहा ज्ञानचंदानी,प्रांतपालांचे प्रतिनिधी पयोड बेहेडे यांची विशेष उपस्थिती होती.सोहळ्यात रोटरी ग्रीनसिटीचे मानद सचिव ॲड.अभय कुलकर्णी व सार्जंट ॲट आर्म्स म्हणून यशवंत महाजन यांना सुद्धा पदभार देण्यात आला.प्रारंभी दीप प्रज्वलनानंतर प्रभाकर संगीत कला अकादमीच्या तेजस्विनी क्षीरसागर, संस्कृती गवळे व वरदा तळेले या विद्यार्थ्यांनी कथ्थक नृत्यद्वारे गणेश वंदना सादर केली.
जळगाव शहराच्या रोटरीच्या इतिहासातील पहिल्या महिला व सर्वात कमी वयाच्या चार्टर अध्यक्षा म्हणून कु.धनश्री विवेक ठाकरे यांनी पदग्रहणानंतर नवीन अकरावा क्लब स्थापन करण्यामागील आपली भूमिका व्यक्त केली.रोटरीच्या ध्येय धोरणावर काम करून विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम,पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास तसेच स्थानिक भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी प्रभावी काम करण्याचा मनोदय बोलून दाखवला.
रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीनसिटीच्या नूतन कार्यकारणीच्या विविध कमिट्यांच्या चेअरमन व नूतन कार्यकारिणीची घोषणा सुद्धा कु.धनश्री ठाकरे यांनी केली.त्यात उपाध्यक्ष रत्नाकर पाटील, कोषाध्यक्ष डॉ.भावना चौधरी यांच्यासह माधुरी थोरात, कमलेश सोनवणे, इरफान पिंजारी, योगेश बिर्ला, भूषण जाधव, योगेश महाजन, हेमंत जोशी, अर्चना माळी,भूषण पाटील, सोनल पाटील, दीपक खडके, विजय मोरे, योगेश चौधरी, नितीन पाटील, प्रमोद पाटील, सावरिया ओझा, प्रवीण सपकाळे, अभिजीत पाटील, पूजा वाघ, समीर रोकडे, प्रवीण सपकाळे, डॉ.दीपक पाटील यांना प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या हस्ते रोटरी सदस्यत्वाची पिन प्रदान करण्यात आली.
सोहळ्यास रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ.चंद्रशेखर सिकची, प्रेसिडेंट एन्क्लेव्ह चेअरमन जितेंद्र ढाके, सहप्रांतपाल संजय गांधी,रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष जितेंद्र बरडे,रोटरी मिडटाऊनचे सचिव डी.ओ.चौधरी, रोटरी जळगाव ह्युमॅनिटीचे सचिव रितू रायसिंघाणी या मान्यवरांसह नूतन सदस्य आणि कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा रंगलानी, परिचय सचिन जेठवाणी यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ.दीपक पाटील यांनी केले तर आभार उपाध्यक्ष रत्नाकर पाटील यांनी मानले.
















