हैदराबाद (वृत्तसंस्था) हैदराबादच्या महाबुबाबादमधील वेमुनूर नावाच्या एका छोट्याशा गावात एका शेतकऱ्यानं मोठ्या कष्टानं पै पै साठवून पोटावरील शस्त्रक्रियेसाठी २ लाख जमा केलेल्या नोटा उंदरानं कुरतडून नष्ट केल्या आहेत. कुरतडलेल्या नोटा पाहून शेतकऱ्याला मोठा धक्का बसला आहे.
भाजीपाल्याची शेती करणारे रेडिया नाईक यांनी आपल्या राहत्या घरातील कपाटात २ लाख रुपयांची रक्कम ठेवली होती. यात सर्व पाचशेच्या नोटांचा समावेश होता. नाईक हे आपल्या दुचाकीवरुन भाजीपाला विकण्याचा व्यवसाय देखील करतात. आज त्यांनी पैसे ठेवलेली बॅग उघडून पाहिली असता त्यांना सर्व नोटा उंदरानं कुरतडून टाकल्याचं दिसून आलं आणि त्यांना धक्काच बसला. रेडिया नाईक यांना पोटदुखीचा त्रास आहे. त्यासाठी एका रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. यासाठीच ते दोन लाखांची रक्कम जमा करत होते. महबुबाबादमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. यासाठी त्यांना चार लाखांचा खर्च सांगण्यात आला होता.
रेडिया नाईक यांनी मोठ्या कष्टानं ही कमाई केली होती. ही रक्कम पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी नाईक यांनी जमा केली होती. कुरतडलेल्या नोटा घेऊन ते बँकेत गेले असता बँकेनंही नोटा स्वीकारल्या नाहीत.