छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) धावत्या कारने पेट घेतल्याने चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना कन्नड तालुक्यातील शेलगाव -घाटनांद्रा रस्त्यावर शुक्रवारी (दि.१५) पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. संजय दगडू जंगले (४८) असे मृत चालकाचे नाव आहे. दरम्यान, मयताच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
कन्नड तालुक्यातील शेलगाव ते घाटनांद्रा रोडवर पूर्णा नदीजवळ पहाटे काही मुले रनिंग करत असताना त्यांना अल्टो कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली. त्यांनी ही माहिती शेलगावचे पोलीस पाटील सलीम नब्बी पटेल यांना. माहिती मिळताच पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक देविदास वाघमोडे व इतरांनी घटनास्थळ गाठले.
गाडीच्या नंबरवरून (एम.एच.२० इ. इ. ०२७०) त्यांना मालकाचे नाव कैलास माधवराव नवघरे (रा. वाकोद हल्ली मुक्काम छत्रपती संभाजीनगर), असल्याचे उघडकीस तपासणीत संजय दगडू जंगले हा कार चालवत होता. तो घाटनांद्रा येथे मावस सासूकडे रात्री जेवायला गेला होता. जेवण आटोपल्यानंतर तो सारोळाकडे जात असताना आपण मोबाइल विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर घाटनांद्रा दिशेने निघाला असता गाडी लिबांच्या झाडाला घासली. यामुळे कारने पेट घेतला असल्याची शंका आर.टी. ओ. अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, संजय जंगले हे सारोळ्याकडे जात होते, तर मग कारचे तोंड शेलगावऐवजी घाटनांद्रयाकडे कसे ? दुसरे वाहन धडक देऊन निघून गेले असेल तर कार रस्त्याच्या कडेला सरळ उभी कशी? तांत्रिक बिघाडामुळे कारने पेट घेतला असता तरी जंगले यांनी तातडीने कार थांबवून ते बाहेर पडू शकले असते. हा अपघात नसून घातपात असल्याची चर्चा दिवसभर परिसरात होती.