वर्धा (वृत्तसंस्था) आर्वी शहरातील तळेगाव मार्गावरील आयसीसीआय बँकेसमोर दुचाकीने जात असलेल्या तरुणीला समोरुन जाणाऱ्या ट्रकने चिरडल्याची घटना शुक्रवार, १ डिसेंबरला दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. प्रियांशी रमण लायचा (वय १७, रा. गांधी चौक, आर्वी) असे मृतकतरुणीचे नाव आहे.
प्रियांशी ही आपल्या दुचाकीने लहान बहिणीचे आधार कार्ड घेऊन कृषक कन्या शाळेत जात होती. याचवेळी समोरून येणाऱ्या एका ट्रकने तिला चिरडले.या अपघातात समोरच्या चाकात आल्याने प्रियांशीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, ट्रक चालकाने पोलीस स्टेशन आर्वी येथे पोहोचत, तरुणी स्वतःच्या चुकीने ट्रकखाली आल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
अपघातानंतर मृतकच्या परिवाराने घटनास्थळावरून मृतदेह उचलण्यात पोलिसांना विरोध केला. सर्वप्रथम चालक व वाहकाला आमच्याकडे सोपवा व नंतरच मृतदेहाला हात लावा, असा पवित्रा घेतला. जवळपास दोन तासानंतर व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्ती केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह उचलला. यावेळी संतप्त नागरिकांनी ट्रकच्या काचा फोडल्या. तर काहींनी ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच पोलीस पोहोचल्याने वातावरण शांत झाले.