नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील दहा दिवसांपासून युक्रेनमध्ये रशियन सैन्याचा धुदगूस सुरू आहे. युक्रेनची महत्वाची शहरं रशियन आर्मीने स्वत:च्या ताब्यात घेऊन त्यावर हल्ला चढवला. दरम्यान, युक्रेनमध्ये काही तासांसाठी एकतर्फी शस्त्रसंधी लागू केली आहे. युक्रेनमध्ये युद्धग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना पोहचवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे रशियाने म्हटले.
रशियाच्या निर्णयामुळे भारतीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या होत्या. तिसरी फेरी आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. रशियन सरकारची वृत्तसंस्थाने याबाबतचे वृत्त दिले आहे. मॉस्कोतील स्थानिक वेळ सकाळी १० वाजल्यापासून रशियाने शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. मानवीय दृष्टीकोणातून नागरिकांना आवश्यक मदत पोहचवण्यासाठी आणि इतर सुरक्षित ठिकाणी त्यांना स्थलांतरीत करता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
भारताने केले होते शस्त्रसंधीचे आवाहन
रशिया आणि युक्रेनने शस्त्रसंधी लागू करण्याचे आवाहन भारताने केले होते. ही शस्त्रसंधी लागू झाल्यास तीन हजार भारतीयांना या युद्धग्रस्त भागातून सुखरूप मायदेशी आणता येईल. खारकीव्ह आणि सुमी या पूर्व युक्रेनच्या भागात मोठ्या प्रमाणावर हल्ले-प्रतिहल्ले, गोळीबार सुरू असल्याने भारतीयांची सुटका करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते.















