मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला (Salman Khan) लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) गँगकडून पुन्हा धमकी देण्यात आली आहे. याबाबत मुंबईतील (Mumbai) वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर बॉलिवूड जगतात खळबळ निर्माण झाली असून पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ केली आहे.
धमकीचा ई-मेल !
गोल्डी भाईला (गोल्डी ब्रार) तुमचा बॉस सलमानशी बोलायचं आहे. तुम्ही मुलाखत (लॉरेन्स बिश्नोई) पाहिलीच असेल. कदाचित पाहिली नसेल, तर मला सांगा. मॅटर क्लोज करायचा असेल तर फेस टू फेस चर्चा करायला हवी. आता वेळ आहे म्हणून सांगितलं, पुढच्या वेळी झटका देणार.”, असं सलमानला पाठवण्यात आलेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये लिहिण्यात आलं आहे. रोहित गर्ग या आयडीवरुन हा मेल आला सलमानला पाठवण्यात आला आहे. धमकीचा ई-मेल आल्यानंतर सलमान खानच्या टीमने या संदर्भात गुन्हा नोंद केला आहे. त्यानंतर मुंबईतील वांद्रे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 120 बी, 506 (2) आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा ई-मेल एका टोळीकडून आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबई पोलिसांनी गँगस्टर गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोई आणि रोहित गर्ग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कुठल्याही कार्यक्रमात उपस्थित न राहण्याचा अभिनेत्याला सल्ला
पोलिसांनी सलमान खानला त्याच्या सुरक्षेचा विचार करून त्याचे वेळापत्रक बदलण्याचा सल्ला दिला आहे. तो पुढे म्हणाला, “त्याच्या टीमला पुढील काही दिवस कोणत्याही कार्यक्रमांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्याचा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे आणि त्यासंदर्भात काही प्रमोशनल उपक्रम होणार आहेत. पण ते टाळण्याच्याच सल्ला सध्या त्याला देण्यात आला आहे.’ सलमान खानचा चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ पुढील महिन्यात एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे. प्रमोशन सहसा चित्रपटाच्या रिलीजच्या सुमारे एक महिना आधी सुरू होते, ज्या दरम्यान अधिक सुरक्षिततेची काळजी घ्यावी लागते. पण सलमान सध्या मुंबईत नाही आणि तो केव्हा परत येईल याबद्दल काहीच माहिती नाही.