जळगाव (प्रतिनिधी) महसूल विभागाने कारवाई करत पकडलेले वाळूचे डंपर अज्ञात चोरट्यांनी एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या आवारातून चोरीला गेल्याची खळबळजनक घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांनी तपासचक्र फिरवीत आज सकाळी आरोपीला अटक केल्याचे कळते.
यासंदर्भात अधिक असे की, २२ जून रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जळगाव तहसीलदार यांच्या पथकातील आव्हाणे येथील तलाठी मनोहर बावस्कर व ममुराबाद तलाठी वीरेंद्र पालवे यांनी तालुक्यातील विटनेर शिवारात भूषण मंगल धनगर (रा. वैजनाथ ता. एरंडोल) यांचा डंपर (क्रमांक एम.एच. ४६ एफ ३७६४) द्वारे अवैधरित्या वाळूची वाहतूक करीत असताना मिळून आल्यानंतर तलाठी यांनी दंडात्मक कारवाई होईस्तर सदरचे डंपर हे पोलीस स्थानकात जमा केले होते. त्यानुसार हे डंपर पोलीस स्थानकाच्या मागील बाजूस वाळूने भरलेल्या स्थितीत उभे होते. दरम्यान १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे आणि इतर कर्मचारी पोलिस स्टेशनच्या आवारातील जप्त मुद्दे मालाची पाहणी करीत असताना त्यांना सदर डंपर जागेवर नसल्याचे दिसून आले. यासंदर्भात पोहेका श्रीराम बोरसे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान डंपर सोडणारा आरोपी ला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळते.