भडगाव (प्रतिनिधी) शहर व तालुक्यात गिरणा नदी पात्रातून सर्रास अवैध वाळू उपसा सुरु आहे. महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. तरीही अवैध वाळू वाहतूक थांबण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, जुने महिंदळे रस्त्यावर अवैध वाळूचे ट्रॅक्टर पथकाने थांबवले. त्यामुळे रात्र गस्तीवर असणाऱ्या पथकातील तलाठी व कोतवाल यांच्यावर दोन वाळू माफियांनी ट्रॅक्टर अंगावर घालते ठार मारण्याचा प्रयत्न करुन शिवीगाळ ही केली. या बाबत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील गुढे तलाठी संजय विश्राम सोनवणे, खेडगांव खुर्द येथील कोतवाल समाधान माळी, गोंडगावचे तलाठी विवेक महाजन, कजगाव २चे तलाठी गितेश महाजन हे खासगी दुचाकीने अवैधरित्या गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. दरम्यान, जुने महिंदळे रस्त्यावर त्यांना एक ट्रॅक्टर येताना दिसले. ट्रॅक्टरवरील चालकास ट्रॅक्टर थांबवण्यास सांगितले. या विना क्रमांकाच्या सोनालिका कंपनीच्या निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरला निळ्या रंगाची विना क्रमांकाची ट्रॉलीही जोडलेली होती. या ट्रॉलीत अंदाजे १ ब्रास अवैध वाळू भरलेली होती. भडगावातील गिरणा नदी पात्रातून भरलेल्या वाळू वाहतुकीचा परवाना व नाव विचारले असता परवाना नसल्याचे सांगत त्याने नाव ही सांगितले नाही. त्यानंतर तेथे एक व्यक्ती दुचाकीवर आला. त्याने ट्रॅक्टर व ट्रॉली माझ्या मालकीची आहे, असे सांगितले. तर ट्रॅक्टर व ट्रॉली कायदेशीर कारवाईसाठी तहसील कार्यालयात लावण्यास सांगितले.
या ट्रॅक्टरवर कोतवाल समाधान माळी, तलाठी गीतेश महाजन बसले. त्यानंतर दत्तू भगत सोनवणेने ट्रॅक्टर जोरात रेस देवुन ट्रॅक्टरवर उचकवून कोतवाल समाधान माळी, गितेश महाजन यांना ट्रॅक्टरखाली पडण्याचा प्रयत्न केला. तसेच ट्रॅक्टरसमोर तलाठी संजय सोनवणे व विवेक महाजन उभे असताना त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवीगाळ केली. त्यानंतर घाबरुन पथकातील कर्मचारी बाजुला झाले. तर ट्रॅक्टरवर बसलेले कोतवाल समाधान माळी, गितेश महाजन यांना काही अंतरावर नेवून त्यांना धक्काबुक्की व दमदाटी करुन ट्रॅक्टरखाली उतरवून वाळून भरलेले ट्रॅक्टर व ट्रॉली घेवून चालक पळून गेला.
याबाबत गुढे येथील तलाठी संजय सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तू भगत सोनवणे (रा. भडगाव पेठ, भडगाव) यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर यात गिरणातून ४ हजार ७२६ रुपयांची अंदाजे १ ब्रास अवैध वाळू व पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करुन ठार मारण्याचा प्रयत्न अन् शासकीय कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करत आहेत.