नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत खोटे बोलले. खोटे बोलणे, लोकांची दिशाभूल करणे, ही मोदींची सवय आहे आणि त्यामुळेच विरोधकांनी सभात्याग केला, असा दावा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप हेच खरे संविधान विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेस हा राज्यघटनाविरोधी पक्ष असल्याचा आरोप केला. यावर खरगे यांनी आक्षेप घेत बोलू देण्याची विनंती केली. परंतु सभापतींनी त्यांना बोलू न दिल्यामुळे – इंडिया आघाडीच्या खासदारांनी गोंधळ घातला आणि नंतर सभात्याग केला. संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना खरगेंनी T मोदींवर खोटे बोलत असल्याचा आरोप केला. मोदींनी सभागृहात चुकीची माहिती दिली. खोटे बोलणे, लोकांची दिशाभूल करणे ही त्यांची सवय आहे. राज्यघटनेच्या विरोधात कोण होते आणि राज्यघटनेचे समर्थक कोण होते, हे मला स्पष्ट करायचे होते. परंतु मला बोलू दिले नाही. संघाचे – मुखपत्र असलेल्या ऑर्गनायजरच्या ३० नोव्हेंबर १९५० सालच्या लेखात राज्यघटनेचा विरोध करण्यात आला होता. संघ आणि T भाजप हे सुरुवातीपासूनच राज्यघटनेच्या विरोधात आहेत. मात्र ते आमच्यावर खोटे आरोप करत आहेत, असे खरगे म्हणाले. खरगेंसोबत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, पी. चिदंबरम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उबाठा) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांसह राजद, तृणमूल, द्रमुकसह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. विरोधी पक्षनेत्यास बोलू देण्याची संसदेची प्रथा आहे. परंतु खरगेंना बोलू न दिल्यामुळे आम्ही सर्वांनी सभात्याग केला, असे इतर नेते म्हणाले.