धुळे (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी आज सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली असता त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘धुळे जिल्ह्यातील बहुचर्चीत आणि विकासाचा आदर्श म्हणून डांगोरा पिटणाऱ्या शिरपूर तालुक्यातील सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे आदिवासींचा छळ, भ्रष्टाचार, अनागोंदी आणि भोळ्या भाबड्या आदिवासींच्या आरोग्याचे छळ केंद्र म्हणून कदाचित देशात पहिला क्रमांक मिळू शकेल’ असा घणाघाती आरोप अनिल गोटे यांनी केला.
सांगवी आरोग्य केंद्रातील अनागोंदी अवहेलना व निष्पाप अभ्रकांचे मृत्यु या गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधणार असल्याची माहिती यावेळी अनिल गोटे यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेत भाजपाची एकछत्री सत्ता आल्यापासून बेकायदेशीर कारभार, अनागोंदी कायदे धाब्यावर बसवून काम करण्याची हुकूमशाही वृत्ती या गोष्टींचा परिणाम जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या सर्व विभागांवर झाला, असल्याचंही यावेळी अनिल गोटे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ‘गरीब आदिवासींच्या जीवनाशीचा खेळ खंडोबा मांडला आहे. जी दुरावस्था सांगवीमध्ये आहे, तिच परिस्थिती थोड्या फार फरकाने सर्वत्र आहे. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या ठिकाणी महिलांचे अतोनात हाल होतात. मात्र, तरीदेखील संपर्क साधून कोणी याठिकाणी दखल घ्यायला तयार होत नाही. सोयी-सुविधांच्या अभावि अनेकांचा जीवदेखील जातो. त्यामुळे आदिवासी भागातील रुग्णालयाची अवस्था सध्यातरी रामभरोसे दिसून येत आहे.’ असं अनिल गोटे यांनी म्हटलं आहे.