जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ म्हणजेच मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची बिनविरोध निवडून येण्याची परंपरा कायम राहीली. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम देखील बिनविरोध निवडून आले आहेत. दूध संघाप्रमाणेच राज्य मार्केटिंग फेडरेशनवर दोन्ही मित्र निवडून आले आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीची आज माघारीचा शेवटचा दिवस होता. गेल्या सात ते आठ महिन्यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शासनाने या निवडणुकीला स्थगिती दिली होती. स्थगिती उठल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,सहकार मंत्री ना.दिलीपराव वळसे पाटील,ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन,ना.गुलाबराव पाटील,ना.अनिल पाटील तसेच आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.त्यात नाशिक विभागा पाच जिल्ह्यातून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार तसेच भाजपाचे उपाध्यक्ष व दूध संघाचे संचालक रोहित निकम यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडणुकीसाठी नासिक येथील अपूर्व हिरे, राजेंद्र ढोकळे,शाहू पाटील,युवराज तनपुरे,दत्ताजी पानसरे व भाजपाचे संजय गरुड,संजीव रघुवंशी या मान्यवरांनी नेत्यांच्या विनंतीवरून उमेदवारी अर्ज मागे घेतले.
महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या महाराष्ट्र राज्याच्या जळगाव विभागातून म्हणजेच जळगाव धुळे नाशिक नंदुरबार या विभागातून देखील संजय पवार यांची कापूस उत्पादक पणन महासंघात विभागीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली होती.
…..रोहीत निकमांच्या रूपाने भाजपाची राज्य पणन महासंघात ‘एण्ट्री’!
रोहित निकम यांच्या आई श्रीमती शैलजा देवी निकम यांनी यापूर्वी मार्केटिंग फेडरेशनमध्ये अनेक वर्ष संचालक व उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे रोहित निकम यांना देखील सहकार क्षेत्रामध्ये घराण्याचा वारसा असल्या कारणाने त्यांनी देखील आता राज्यावर आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. रोहित निकम यांचे आजोबा बॅरिस्टर निकम यांनी जळगाव जिल्हा सहकार बोर्डाची स्थापना केली केली आहे. सहकारातील नेतृत्व भाजपाला रोहित निकम यांच्या रूपाने मिळालेले आहे. दुसरीकडे भाजपाला सहकार क्षेत्रात राज्यस्तरावर तरूण,तडफदार व सहकारातील जाण असलेला चेहरा मिळाला आहे.रोहीत निकम यांच्या उमेदवारीसाठी स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्री गिरीष महाजन,आ.मंगेश चव्हाण यांनी थेट अजित पवार यांच्याशी संपर्क साधला. चर्चेअंती रोहीत निकम यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले. रोहीत निकम यांच्या रूपाने भाजपाने राज्य पणन महासंघात ‘एण्ट्री’केली आहे.
















