मुंबई (वृत्तसंस्था) पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना आणखी 14 दिवस न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.
पत्राचाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी ईडीनं ९ तास संजय राऊतांची चौकशी केल्यानंतर 31 जुलै रोजी रात्री उशीरा अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दोनदा ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याची मुदत संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून, आता राऊतांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात असणार आहे. या सर्वांमध्ये दिलासादायक बाब म्हणजे राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने आता जामीन अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयानं दिलं आहे.
पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांना मोठा आर्थिक लाभ झाल्याचा आरोप ईडीकडून लावला जात असून विविध अकाउंटवरून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर एक कोटीपेक्षा जास्त पैसे आल्याचा आरोप केला जात आहे. पत्राचाळ प्रकरणातील या अवैध पैशांमधून त्यांनी अलिबागमध्ये जमीन घेतल्याचा आरोप केला जात असून, ईडीने त्यांना समन्स बजावल्यानंतर त्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या.