मुंबई (वृत्तसंस्था) ‘जा आणि मर’ हे वाक्य आरोपीकडून संतापाच्या पोटी उच्चारले गेले असावे, म्हणून ‘जा आणि मर’ हे वाक्य आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊ शकत नाही, असा युक्तिवाद अॅड. अनिकेत निकम यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलाय. दरम्यान, अॅड. निकम यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी गणेश लांडगे यास न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
तेजस पालकर (रा.पिंपळगाव, ता. दौंड, जि.पुणे) हा गणेश लांडगे यांच्या भोसरी येथील पेट्रोल पंपावरती काम करीत होता. दि १७ जुलै २९२१ रोजी गणेश लांडगे याने तेजस याला पेट्रोल पंपावरती बोलावून त्याने पैश्याचा अपहार केला. असा आरोप करून त्याच्या विरुद्ध पोलिसात तक्रार करतो, अशी धमकी दिली होती. गणेश लांडगे यांच्या या धमकीमुळे तेजस याने दि. १४ जुलै २०२१ रोजी राहत्या घरी आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी तेजस याने सुसाईड नोट लिहून त्याने मान्य केले होते की, त्याने पेट्रोल पंप मालक गणेश लांडगे यांच्याकडून ४० हजार रुपये कर्ज घेतले होते. कर्ज फेडण्याकरीता मालक गणेश लांडगे यांच्याकडे मुदत मागितली होती, परंतु त्यास आरोपी गणेश मुदत देण्यास तयार नव्हता. पैसे दिले नाही तर तेजसने पेट्रोल पंपावर अपहार केला, अशी देखील तो धमकी देत होता.
मानहानीचा भीतीने तेजस याने दि. १४ जुलै २०२१ रोजी आत्महत्या केली. तेजस याची बहीण अमरजा हिने आरोपी गणेश लांडगे याच्या विरुद्ध भोसरी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. भोसरी पोलिसांनी आरोपी गणेश लांडगे यास अटक करून गुन्हा दाखल केला.
पेट्रोल पंप मालक याच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात काम चालविताना ॲड. अनिकेत निकम यांनी असा युक्तिवाद केला की, मयत तेजस याने सुसाईड नोटमध्ये पेट्रोल पंप मालक गणेश याच्या विरुद्ध एवढाच आरोप केला आहे की, घटनेच्या दिवशीमयत तेजस आरोपी गणेशला म्हणाला होता की, जर त्याने त्याच्या विरुद्ध पोलीसांकडे तक्रार केली तर तो आत्महत्या करेल. त्यावर आरोपी गणेश त्यास म्हणाला ‘जा आणि मर’. हे वाक्य आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊ शकत नाही, असे प्रतिपादन ॲड. अनिकेत निकम यांनी केले.
ॲड. अनिकेत निकम यांनी सर्वोच्य न्यायालयाच्या अनेक निकालांचा दाखला देत असे प्रतिपादन केले की, भा.द.वि ३०६ च्या गुन्ह्यासाठी आरोपीला कल्पना येणं आवश्यक आहे की, त्याचे बोलणे किंवा कृत्य यामुळे समोरची व्यक्ती आत्महत्या करू शकते. फक्त ‘जा आणि मर’ हे वाक्य आरोपीकडून संतापाच्या पोटी उच्चारले गेले असावे. परंतु त्यावरून आरोपी गणेश याच्या बोलण्याने तेजस याने आत्महत्या केली असे सिद्ध होत नाही. उच्च न्यायालच्या न्यायमूर्ती श्रीमती डांगरे यांनी ॲड. अनिकेत निकम यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी गणेश लांडगे यास जामिनावर मुक्त केले.