जामनेर (प्रतिनिधी) पहूर परिसरासाठी गुरुवार अपघात वार ठरला असून विविध चार ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून यातील चार जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पहूर ते जामनेर मार्गावरील सोनाळा शिवारात एका व्यापाऱ्याने मार्गाच्या बाजुला असलेल्या ट्रक ले-बाय परिसरात मका पसरवला होता. दरम्यान, याच रस्त्यावरुन शिवना येथून भुसावळकडे बाजारात भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ४०७ मालवाहू टेम्पो (एमएच- २०, डीई ४३१३) हा सोनाळा शिवारात मध्यरात्री ११.३० वाजेच्या सुमारास जात होता. तर रस्त्यावर असलेल्या मक्यावर गेल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा टेम्पो उलटला. याच वेळी समोरून पहूरकडे येणारी दुचाकी (एमएच-१९, बीआर- २१२६) ही देखील आदळली. तर टेम्पो खाली समोरुन येणारी दाबली गेल्याने दुचाकीस्वार शेंदुर्णी येथील मयूर गणेश चौधरी (वय २५) व धुळे येथील शंकर भगवान चौधरी (वय ३५) हे दोघे शालक आणि मेव्हणे जागीच ठार झाले.
तर दुचाकीवरील तिसरे मयूर देवेंद्र गोढरी हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच सिल्लोड तालुक्यातील शिवना येथीलटेम्पो चालक शेख सलिम शेख याकूब यांची ही प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातातील दोघे मयत तसेच दोन्ही जखमींना पहुर येथील १०८ रुग्णवाहिकेचे चालक अमजद खान व डॉ. लियाकत अब्बासी यांनी तत्काळ पहुर ग्रामीण दाखल केले. तर पुढील उपचारार्थ त्यांना जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणी शेंदुर्णी येथील रघुनाथ चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मका व्यापारी पंकज प्रकाश लोढा व टेम्पो चालक शेख सलीम शेख याकूब यांच्याविरुद्ध पहुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत अजिंठा येथून दुरुस्तीसाठी टाटा ४०७ (एमएच ०४, डीके ३१९३) कंपनीची गाडी जळगावला आणली होती. ती दुरुस्त करुन परत अंजिठ्याकडे जात होते. दरम्यान, पहूरकडे जात असताना आज मध्यरात्री पाळधी नजिक ती गाडी पुन्हा नादुरुस्त झाली. त्यामुळे टेम्पो चालक कलीम शेख मोहम्मद हे खाली उतरले. त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा शेख तौसिफ व कारागीर हाकिम शेख सरदार हे देखील खाली उतरले.
या वेळी गाडीतील बिघाड पाहत असतानाच जळगावकडून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर (एमएच १८, एए- ७६०७) ने या टेम्पोला उजव्या साईडने जबर धडक दिली. यामुळे टेम्पो चालक कलीम शेख रस्त्यावर फेकले गेले. त्यांना तत्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. मयूरी पवार यांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी आयशर चालकाविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर चौथा ट्रॅक्टरचा अपघात शेंदुर्णी येथे आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास झाला. ट्रॅक्टरच्या झालेल्या अपघातात शेंदुर्णी येथील सलाउद्दीन शेख जैनुद्दीन (वय ३२) हा तरुण जागीच ठार झाला. याप्रकरणी पहूर पोलिसांत गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. दरम्यान, या अपघातातील मयत सलाउद्दीन यांनाही शवविच्छेदनासाठी पहुर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.