वैजापूर (वृत्तसंस्था) बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी (दि. २५) दुपारी चार वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील डवाळा शिवारात घडली. आयुष संतोष पडवळ (१३) व शाहीद इरफान सय्यद (१८, दोघेही रा. डवाळा) अशी मृतांची नावे आहेत.
रविवारी शाळेला सुटी असल्यामुळे डवाळा येथील आयुष पडवळ व शाहीद सय्यद हे दोघे बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. बकऱ्या पाण्याच्या दिशेने गेल्याने तोसुद्धा तलावाकडे गेला. मात्र, पाय घसरून पडला. त्याला वाचविण्यासाठी जवळच असलेल्या शाहिदने पाण्यात उडी टाकली; पण पाण्याचा अंदाज न आल्याने व त्याला पोहता येत नसल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जलतरणपटू, ग्रामस्थ व पोलिसांनी दोघांना बाहेर काढले. मयत आयुष हा डवाळा येथील मुक्तानंद प्राथमिक विद्यालयाचा आठवीचा तर शाहीद हा कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी कॉलेजचा विद्यार्थी होता.