धरणगाव (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मण पाटील (सर) यांची संभाजी ब्रिगेडच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी तर जळगाव येथील सामजिक कार्यकर्ते मयूर चौधरी यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संभाजी ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणी, जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी यांची बैठक प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दादासाहेब दरोडे हॉल आगरकर रोड, पुणे येथे संपन्न झाली. कार्यक्रमाच्या सुरवातीला “रौप्य महोत्सवी अधिवेशन” यशस्वी केल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. राज्य अधिवेशनाचा आढावा घेण्यात आला. शेती विषयक धोरण, हक्काचे प्रदेश कार्यालय, निवास व्यवस्था, हॉल, ग्रंथालय तयार करणे, छत्रपती संभाजी राजे सन्मान परिक्रमा, नवी विचार नवी दिशा या संदर्भातील चित्रफीत व नाटक तयार करणे, पुढील वर्षाचे परिपूर्ण नियोजन अशा विविध विषयांवर चर्चा झाली. सदर बैठकीत प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष श्याम पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, महानगराध्यक्ष संदीप पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते तथा, व्याख्याते लक्ष्मणराव पाटील (सर) यांना प्रवीणदादा गायकवाड यांच्या हस्ते जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी तर मयूर चौधरी यांना उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्र यावेळी देण्यात आले.
याप्रसंगी राज्य कार्यकारिणी बैठकीत नवनियुक्त जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी आपल्या मनोगतात संभाजी ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर व माझ्या कामावर विश्वास ठेवून माझी जळगांव जिल्हा कार्याध्यक्षपदी म्हणून नियुक्ती केली आहे, त्याबद्दल प्रथमतः सर्वांचे आभार व्यक्त केले. तद्नंतर श्री.पाटील पुढे म्हणाले की, संपूर्ण जिल्ह्यात ‘संभाजी ब्रिगेड’चे चांगल्या पद्धतीने वादळ निर्माण करून सर्व समावेशक जास्तीत जास्त नवीन कार्यकर्ते जोडण्याचा व संघटन वाढवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल. तसेच, जिल्ह्यात नवी दिशा आणि नवा विचार घेवून संविधानिक आधारावर सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, आणि चांगले कार्य करून राज्यात जळगांव जिल्हा हा प्रथम करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. असे मत श्री.पाटील यांनी पुणे येथे संपन्न झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकी दरम्यान उपस्थितांसमोर केले. याप्रसंगी राज्य कार्यकारिणी सदस्य, जिल्हाध्यक्ष व वैचारिक मान्यवरांसह राज्यातील बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.