सांगली (वृत्तसंस्था) आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, विचारवंत कार्यकर्त्या गेल ऑम्व्हेट यांचे आज निधन झाले आहे. डॉ. गेल यांचे वयाच्या ८१व्या वर्षीय वृद्धपकाळाने निधन झाले.
गेल अॅम्व्हेट यांचा जन्म अमेरिकेत झाला होता. उच्च शिक्षण घेतलेल्या, उंच, गोऱ्या, निळ्या डोळ्याच्या, सोनेरी केसाच्या गेल भारतात अभ्यासाच्या निमित्ताने आल्या. संपूर्ण भारतभर फिरल्या. इथल्या अनेक चळवळींचा जवळून अभ्यास केला. अभ्यास करता करता कष्टकऱ्यांच्या चळवळींचा एक भाग बनल्या. चळवळींना एक भक्कम वैचारिक पाया तयार करण्यास त्यांनी मदत केली. भारत पाटणकर यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या लढ्याच्या अग्रभागी गेल अॅम्व्हेट राहिल्या. मोर्चे, आंदोलनात चळवळीचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी कामगार कष्टकऱ्यांचं नेतृत्व केलं. परिश्रमातून कमावलेले ज्ञानच नव्हे तर आपलं सारं आयुष्य इथल्या कष्टकऱ्यांच्या चळवळीसाठी गेल यांनी समर्पित केलं.
स्वतःच्या गरजा कमी केल्या पण चळवळ पैशाअभावी थांबू दिली नाही. आज श्रमिक मुक्ती दल आणि डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली दहा बारा जिल्ह्यामध्ये जी काही चळवळ उभी आहे त्यामागे डॉ. गेल यांचा फार मोठा त्याग आहे. अमेरिकेतल्या गोऱ्या मॅडम बघता बघता अस्सल मराठमोळ्या बाई कधी बनल्या तेच कळलं नाही. सांगली जिल्ह्यातल्या परित्यक्त्या स्त्रियांची ती मैत्रीण बनली. क्रांतीविरांगना इंदुताई पाटणकर या आपल्या सासुबाईला सोबत घेऊन त्या जिल्हाभर फिरल्या. नवऱ्याने सोडलेल्या, एकट्या राहणाऱ्या स्त्रियांना त्या भेटल्या. त्यांना संघटीत केलं. त्यांना आत्मभान दिलं. त्यांच्या हक्काची जाणीव त्यांना करुन दिली. लढण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण केली. आणि परित्यक्त्यांच्या हक्काचा एक ऐतिहासिक लढा यशस्वी करुन दाखविला. आपल्या सहकारी मैत्रिणींच्या मदतीन बहे ता. वाळवा जि. सांगली येथे परीतक्त्यांची स्वमालकीची घरे उभा करुन दाखवली.
डॉ. गेल यांच्यावर गुरुवार ता. २६ रोजी सकाळी १० वा. कासेगाव जि. सांगली येथे क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. गेल यांना लॉकडाऊन नंतर चालता येत नसल्यामुळे कासेगाव येथे घरीच डॉ. भारत पाटणकर यांच्या देखरेखेखाली वैद्यकीय उपचार घेत होत्या.