चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वाघळी येथे दि. १२ रोजी एकमेकांकडे बघण्याच्या शुल्लक कारणावरून पाच जणांनी एका तरुणाचा चाकूने भोसकून खून (murder) केल्याची घटना घडली आहे. तर घटनेत भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मताचा काका देखील जखमी झाला आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात (police) गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत पाच पैकी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात अधिक असे की, बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सय्यद मुसा खाटीक, साजिद मुसा खाटीक, आदिल साजिद खाटीक, तनवीर साजिद खाटीक, सय्यद समीर खाटीक (सर्व राहणार वाघळी) यांनी वाघळी गावातीलच मोहन विजय हाडपे (वय १८) या तरुणासोबत गावात असलेल्या व्यायाम शाळेजवळ एकमेकाकडे पाहण्याच्या शुल्लक कारणावरून वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. मोहन हडपे याचे काका रवींद्र भास्कर हडपे या ठिकाणी भांडण सोडविण्यासाठी आला असता, त्याला देखील वरील पाच जणांनी रॉड डोक्यात घालून दुखापत केली.
तर मोहन हडपे याचे आदिल खाटीक, तनवीर खाटीक, समीर खाटीक यांनी दोन्ही हात पकडून धरत आदिल साजिद खाटीक याने त्याच्या जवळील चाकूने मोहनच्या पोटावर सपा-सप वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. मोहन यास उपचारासाठी चाळीसगाव नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तर काका रवींद्र हाडपे यांना जखमी अवस्थेत येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांचा ताफा वाघळी गावात दाखल झाला या घटनेतील तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी जखमी रवींद्र भास्कर हाडपे यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर ४९३/२२ कलम ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, १०९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.