पुणे (वृत्तसंस्था) वानवडीतील महम्मदवाडी परिसरात असलेल्या सराफा दुकानावर शनिवारी भरदिवसा सहा जणांनी सशस्त्र दरोडा टाकून सुमारे २८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटून नेले. या प्रकारामुळे या भागात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी चौघांना ताब्यात घेतले आहे.
दरोडेखोर वीस ते पंचवीस वयोगटातील असून त्यांनी मास्क लावले होते. चाकू, मिरचीचा स्प्रे व अन्य साधनांचा वापर केला असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. वर्णनावरून त्यांचा तपास सुरू करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या परिसराची नाकाबंदी करून वाहनांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. महम्मदवाडी रस्त्यावरील वाडकर मळा परिसरात बी. जी. एस. ज्वेलर्स ही सराफी पेढी आहे. तेथे शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास दरोडेखोर खरेदीच्या बहाण्याने शिरले. चोरट्यांनी सराफी पेढीचे मालक आणि कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवला. त्यांना बेदम मारहाण करून दरोडेखोरांनी दुकानातील ४० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुबाडून नेले. अवघ्या पाच-सात मिनिटांत हा प्रकार घडला. त्यानंतर दुकानदाराने बाहेर येऊन मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यामुळे स्थानिक दुकानदार व नागरिक तेथे पोचले. नागरिकांनी हा प्रकार कळवल्यावर गस्तीवरील पोलीस घटनास्थळी पोहचले.
दरम्यान, एसटी स्टॅण्ड, खासगी बसचे तळ व रेल्वे स्थानकावर आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील तसेच कारागृहातून नुकत्याच सुटलेल्या गुन्हेगारांचाही तपास सुरू करण्यात आला आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना या गुन्ह्याची माहिती देऊन खबरदारी घेण्याचा संदेश पाठवण्यात आला. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत सर्व पोलीस ठाण्यांतील कर्मचारी व अधिकारी बंदोबस्तासाठी आपापल्या हद्दीत रवाना झाले. दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण व्हायरल झाले आहे.