सांगली (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यामधील वांगी गावातील दिवंगत थोर स्वातंत्र्य शाहीर शंकरराव निकम यांचा मोठा मुलगा अशोकराव निकम यांच्या घराला समोरच्या व मागील बाजूने विद्युत वाहक तारेतून ११ केव्हीचा मोठा शॉक देऊन संपूर्ण कुटुंब संपविण्याचा कट उघडकीस आला आहे. सुदैवाने विद्युत वितरण कंपनीची वांगी आणि तडसर गावची वीज बंद पडल्यामुळे संपूर्ण कुटुंब वाचले आहे.
स्वातंत्र्यशाहिर कै. शंकरराव निकम यांचे मोठे सुपूत्र अशोक निकम हे वांगी गावात कुटुंबियांसह राहतात. अशोक निकम हे मंगळवारी पत्नी व दोन मुलांसह झोपी गेले. रात्री १ वाजता अचानक घरासमोर विजेचा मोठा जाळ झाला व घरातील वीज गेली. घराजवळ ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे जाळ झाला असेल असे समजून दुर्लक्ष केले. दुसऱ्यांदा बीज आल्यानंतर पुन्हा जाळ झाल्यामुळे मात्र, त्यांनी घरातील सर्वांना जागे केले आणि बॅटरीचा उजेड पाडून बाहेर डोकावल्यानंतर त्यांना वीज वाहक तार घराच्या दरवाजाजवळ अडकवलेली दिसली. ती तार ११ केव्ही ट्रान्सफॉर्मरवरला जोडून करंट दिल्याचे उघडकीस आला. तर करंट दिलेली तार काढून घेऊन जाण्यासाठी त्या तारेला एक हजार फूट लांब दोरी बांधून ती बाजूला असलेल्या उसातून जोडून ठेवली असल्याचे दिसून आले.
निकम कुटुंबाने बॕटरीने खिडकीतून कानोसा घेतला असता सावध होऊन निकम कुटुंबीयांनी तातडीने सुरक्षेच्या दृष्टीने हालचाली केल्या. दरम्यान, काही लोक तेथे मोठ्याने बोलत असल्याचे व पिकाचा फायदा घेऊन धावत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हल्लेखोर कोण होते, याचा अंधारामुळे सुगावा लागला नाही. मध्यरात्रीनंतर अशोकराव यांचे पुत्र सूरज निकम यांनी पोलिसांना कळवले. त्यांनी काही व्यक्तींबाबत संशय व्यक्त केल्याचे पोलिसांना सांगितले आहे.