चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील अडावद येथील अंकलेश्वर – बऱ्हाणपूर महामार्गावर असलेल्या पिर पाखर बाबाच्या दर्याजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास एका शेत मजुराचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. जगदीश फिंगऱ्या बारेला (वय ४०), असे मयताचे नाव आहे.
अंकलेश्वर – बहऱ्हाणपूर महामार्गावर पिर पाखर बाबाच्या दर्यांजवळ जगदीश बारेला याचा मृतदेह रविवारी आढळला होता. त्यांच्या शरीरावर जखमांचे निशाण दिसून आले आहे. पोलिसांनी तात्काळ जळगाव येथील श्वान पथकाला पाचारण केले होते. जगदीश फिंगऱ्या बारेला हा गावाच्या उत्तरेकडील हतनूरच्या उजव्या कालव्यावरील डाव्या चारीवर झोपडीत राहत होता. संपूर्ण कुटुंब शेतमजुरी करन उदरनिर्वाह करीत होते. चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली.
यावेळी अडावद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात उपस्थित होते. यावेळी मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी पोलिसांना एमपी ४६ एमएल ६८८९ या क्रमांकाची मोटारसायकल आढळून आली आहे. मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, खून कोणी व का केला?, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाहीय.